जाखुरीत जनावरांसाठी लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम ; कृषीकन्यांचा पुढाकार
संगमनेर प्रतिनिधी :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर येथील कृषीकन्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने जाखुरी येथे जनावरांसाठी लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली. पशुधनाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासोबतच पशुपालकांमध्ये रोगप्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्याचा उद्देश या मोहिमेतून साधण्यात आला.
या मोहिमेदरम्यान परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले. तसेच पशुपालकांना लाळ्या खुरकूत रोगाची लक्षणे, रोगाचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित लसीकरणाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पशुधन पर्यवेक्षक डॉ. अवधूत गागरे आणि त्यांचे सहकारी नितेश घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही लसीकरण मोहीम पार पडली. जनावरांचे आरोग्य जपण्यासाठी वेळेवर लसीकरण करणे आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमासाठी प्रगतशील शेतकरी दिनकर पानसरे आणि विजय शिंदे यांचे सहकार्य लाभले.

दुष्काळी परिस्थितीत सकस चारा निर्मितीचे प्रात्यक्षिक
सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांना चारा व्यवस्थापनाचेही महत्त्व पटवून देण्यात आले. पशुधन पर्यवेक्षक डॉ. अवधूत गागरे यांनी उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर कसा करावा, कमी दर्जाच्या चाऱ्यावर प्रक्रिया करून तो अधिक सकस व पौष्टिक कसा बनवावा, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविण्याच्या पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
या मोहिमेत कृषीकन्या मधुरा मुंढे, वैष्णवी शिंदे, समृद्धी शिंगोटे, भूमिका वाघ आणि प्रतीक्षा वाकचौरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रतिनिधी तथा ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. राहुल खुळे, ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम अधिकारी डॉ. साजन हिंगोणेकर उपस्थित होते. तसेच विषयतज्ज्ञ शुभम देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
हा कृषी अभ्यास कार्यानुभव कार्यक्रम माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी संस्थेच्या सचिव शरयू देशमुख आणि मुख्य प्रशासक डॉ. संदीप निंबाळकर यांचे सहकार्य लाभत आहे. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रा. जी. बी. बाचकर, शैक्षणिक प्रमुख प्रा. रवींद्र दसपुते, कार्यक्रम अधिकारी डॉ. साजन हिंगोणेकर तसेच इतर विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन या उपक्रमाला मिळत आहे.

