चाळीस वर्षांचा हिशोब मागितल्यावर काहींचा बीपी वाढतो ; आमदार अमोल खताळ यांची टीका !

पालकमंत्री विखे पाटील यांच्याशी मतभेद नाहीत 

संगमनेर / प्रतिनिधी –

संगमनेर तालुक्यातील तब्बल चाळीस वर्षांच्या सत्तेनंतर जनतेने परिवर्तन घडवून आणले. मात्र, हा बदल काहींना अद्यापही पचनी पडत नसल्याचे दिसते. चाळीस वर्षांच्या सत्तेचा हिशोब मागितला की काहींचा बीपी वाढतो, अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. जनतेने दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी आणि रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी सत्ताबदल घडवून आणल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते. व्यासपीठावर संजय मोरे, सुनीता कानवडे, ॲड. अविनाश वलवे, नेताजी घुले, अशोक कानवडे, राजेंद्र देशमुख, कमलेश डेरे, हरीश वलवे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विखे-पाटलांशी मतभेद असल्याच्या चर्चा निराधार

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि आपल्यामध्ये मतभेद असल्याचे चित्र काहींनी जाणीवपूर्वक रंगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मंत्री विखे-पाटील आणि डॉ. सुजय विखे-पाटील यांनीही यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जिल्हा बँकेपुरताच काही विषय होता. आगामी सर्व निवडणुका राजकीय पद्धतीनेच लढल्या जातील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. आमच्यात भांडणे लावण्याचा काहींचा प्रयत्न असून, त्यात त्यांना यश मिळणार नाही, असे खताळ यांनी ठणकावून सांगितले.

दलालांच्या संस्कृतीला आळा घालण्याचा प्रयत्न

चार-साडेचार वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचा उपक्रम मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला होता. अशा योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यापूर्वी मध्यस्थ आणि दलालांच्या संस्कृतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी पैसे दिल्याशिवाय कामे होत नव्हती. मात्र, गेल्या दोन वर्षांत या प्रकारांना आळा घालण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार !

राजकारणात संघर्ष असतोच; मात्र विकासकामे करताना गावातील वातावरण बिघडवणे, कार्यकर्त्यांना त्रास देणे किंवा किरकोळ कारणांवरून वाद निर्माण करणे योग्य नाही. प्रत्येकाने आपापले काम करावे. जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार आहोत. जनहिताच्या कामात कोणी अडथळे निर्माण करत असेल, तर त्याचा सामना करण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही आमदार खताळ यांनी दिली.

निळवंडे धरणाच्या कामाबाबत बोलताना खताळ म्हणाले की, निळवंडे धरण आम्ही बांधले, असा दावा आम्ही कधीच केलेला नाही. मात्र, या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात तुम्ही केली असेल, तर त्याचा शेवट आम्ही केला आहे. निळवंडेच्या पाण्याचा लाभ संगमनेर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

निळवंडेच्या लाभक्षेत्राबाहेरील गावांनाही सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी जलसंपदा विभागाच्या बैठकीत भूमिका मांडली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्पाद्वारे सुमारे १५ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून निळवंडेच्या लाभक्षेत्रापासून वंचित राहिलेल्या संगमनेर तालुक्यातील गावांनाही पाणी मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!