आमदार अमोल खताळांनी दिखाऊपणा सोडून विकासावर लक्ष द्यावे – आनंद वर्पे
संगमनेरात ‘बॅनरबाजी’ अन् ‘श्रेयवादा’वरून पेटलं राजकारण
संगमनेर प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यात सध्या प्रत्यक्षात विकासकामे करण्याऐवजी गावोगावी बॅनरबाजी करून विकास झाल्याचे केवळ आभासी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी या दिखाऊ राजकारणातून बाहेर पडून प्रत्यक्ष विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे, असा घणाघाती हल्लाबोल तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आनंद वर्पे यांनी केला आहे.
थोरात आणि तांबे यांच्या कामांचे श्रेय लाटण्याचा आरोप
माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विकासकामांवर स्वतःच्या नावाचे लेबल लावून त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप वर्पे यांनी केला आहे. तसेच, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या दूरदृष्टीतून आणि प्रयत्नांतून सुरू असलेल्या कामांचेही श्रेय स्वतःकडे घेऊन विनाकारण टेंभा मिरवणे थांबवावे, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.

कायदा-सुव्यवस्था आणि दुष्काळमुद्द्यावर सवाल
वडगावपान येथील बहुचर्चित ॲसिड हल्ल्याचा आरोपी अद्यापही मोकाट असल्याचा मुद्दा उपस्थित करत, केवळ भाषणबाजी आणि आश्वासनांपेक्षा कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर ठोस कृती करण्याची गरज असल्याचे वर्पे म्हणाले. सध्या तालुक्यात गावोगावी आश्वासित करण्यात आलेले रस्ते अखेरची घटका मोजत आहेत. दुष्काळी परिस्थितीत वीज आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अद्यापही चारा छावण्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली.
पोकळ धमक्या आणि जिरवाजिरवीच्या राजकारणावर टीका
तालुक्यातील जनतेला रस्ते, पाणी, वीज, शेती आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उत्तरे हवी आहेत. मात्र, विकासाच्या मुद्द्यांना बगल देऊन जिरवाजिरवीचे राजकारण, केवळ कार्यक्रमबाजी आणि ‘बघून घेतो’, ‘बंदोबस्त करतो’ अशा पोकळ धमक्यांतून जनतेचे मनोरंजन करण्याचा प्रकार सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला.

आमदारांना आत्मपरीक्षणाचा सल्ला
आमदारांनी वेळेत आत्मपरीक्षण करून हमरीतुमरीच्या राजकारणापेक्षा विकासात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारावा. लोकशाहीत जनतेच्या निर्णयाचा आदर करून त्यांच्या अपेक्षेनुसार काम करावे. विरोधकांशी संघर्ष करण्यापेक्षा तालुक्याच्या विकासासाठी निधी आणणे आणि मंजूर कामे मार्गी लावणे याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन आनंद वर्पे यांनी केले आहे.
“राजकीय लढाई २०२९ मध्ये होईलच; मात्र तोपर्यंतचा काळ बॅनरबाजी, श्रेयवाद आणि राजकीय कुरघोड्यांमध्ये वाया न घालवता निधी, विकासकामे आणि संगमनेर तालुक्याच्या प्रगतीसाठी वापरावा. राजकारण निवडणुकीपुरते आणि विकास जनतेसाठी असतो, याचे भान आमदारांनी ठेवावे,” असा मोलाचा सल्लाही शेवटी त्यांनी दिला आहे.

