‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानासाठी बाळासाहेब थोरातांचा मध्य प्रदेशात दौरा
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
लोकशाही, संविधान आणि मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसने सुरू केलेल्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानाच्या तयारीसाठी काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मध्य प्रदेशातील भोपाळ, रायसेन आणि विदिशा जिल्ह्यांचा दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्हा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन अभियानाच्या नियोजनाचा आढावा घेतला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने थोरात यांची मध्य प्रदेशासाठी अभियानाचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भोपाळ येथे पत्रकार परिषदेत त्यांनी मतदार याद्यांतील कथित अनियमितता, निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवर काँग्रेसची भूमिका मांडली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.

तिन्ही जिल्ह्यांतील बैठकांमध्ये मतदार याद्यांची पडताळणी, बूथस्तरावरील संघटनात्मक तयारी, पात्र मतदारांना मदत आणि जनजागृती कार्यक्रमांवर चर्चा झाली. येत्या १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या महारॅलीसाठी मध्य प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग आणि समन्वय याबाबतही सूचना देण्यात आल्या.
काँग्रेसच्या नियोजनानुसार २५ नोव्हेंबरपर्यंत गावोगावी चौपाल, जनजागृती आणि मतदार संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा, यासाठी कार्यकर्त्यांनी गाव, ब्लॉक आणि बूथ स्तरावर सक्रिय राहावे, असे आवाहन थोरात यांनी केले.
दरम्यान, सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी थोरात राजगड आणि सिहोर जिल्ह्यांचा दौरा करून तेथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत अभियानाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

