संगमनेरच्या सुरक्षेसाठी ‘ॲक्शन मोड’: विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाई !
बंद पडलेले १५० सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित
आमदार सत्यजीत तांबें यांचे पोलीस प्रशासनासोबत आढावा बैठक

संगमनेर (प्रतिनिधी) :

संगमनेर शहरात अलीकडच्या काळात घरफोड्यांसह विविध गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी आज (मंगळवार) संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये विशेष आढावा बैठक घेतली. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही; त्यामुळे पोलीस आणि नगरपालिकेने समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, शहरात विनानंबर प्लेट वाहने आढळल्यास संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

या बैठकीस पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह शहरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

यासंदर्भात आमदार तांबे यांच्या प्रसिद्धी विभागाकडून प्रेस नोट देण्यात आली आहे त्यात म्हटले आहे की,

शहराच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेने उभारलेल्या १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण थेट पोलीस स्टेशन आणि पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये देण्यात आले आहे. मात्र, स्ट्रीटलाईटवरून घेतलेल्या वीजजोडणीचे नियंत्रण महावितरणकडून थेट मुंबईतून होत असल्याने तांत्रिक अडचणी येऊन सीसीटीव्ही आणि सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाली होती. बैठकीत ही बाब निदर्शनास येताच महावितरणशी चर्चा करून हे नियंत्रण स्थानिक पातळीवर आणण्यात आले आणि सर्व कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करण्यात आले.

पोलीस प्रशासनाकडे मनुष्यबळ आणि वाहनांची कमतरता आहे. अशा वेळी नगरपरिषदेने उभारलेल्या स्वतंत्र ‘रक्षक दलातील’ १२ जवान, दोन गाड्या आणि दोन बुलेटचा पोलिसांनी प्रभावी वापर करावा. शहरातील संवेदनशील भागांमध्ये रात्रीची आणि नियमित गस्त वाढवण्यासाठी या दलाची मदत घेण्याच्या सूचना आमदार तांबे यांनी दिल्या.

विनानंबर प्लेट वाहनांवर होणार कठोर कारवाई

अलीकडील घरफोड्यांमध्ये विनानंबर प्लेट वाहनांचा वापर झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. नंबर प्लेट नसल्याने गुन्हेगारांची ओळख पटवण्यात अडचणी येतात. त्यामुळे संगमनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात विनानंबर प्लेट वाहने आढळल्यास तात्काळ कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश तांबे यांनी पोलिसांना दिले.

शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, सिग्नल व्यवस्था आणि नवीन नगर रोड परिसरातील वाहतुकीच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली.

बांधकाम परवानगी घेताना पार्किंगसाठी जागा दाखवून प्रत्यक्षात तिचा वापर न करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

 डॉक्टर, हॉस्पिटल्स, मॉल्स, बँका, मंगल कार्यालय आणि मोठ्या दुकानदारांनी ग्राहकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आणि कर्मचारी नेमावेत. ग्राहकांनी रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने लावल्यास त्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील, असे स्पष्ट करण्यात आले.

या समस्या सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात शहरातील सर्व बँका, हॉस्पिटल्स, मॉल्स आणि प्रमुख आस्थापनांच्या प्रतिनिधींची नगरपालिका व पोलिसांसमवेत संयुक्त बैठक घेतली जाणार आहे.

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!