वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आरोग्य शिबिरात २५७ महिलांची कॅन्सरसह विविध मोफत तपासणी
एकविरा फाउंडेशन व एसएमबीटीच्या सहकार्यातून महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर
संगमनेर | प्रतिनिधी
वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान व्हावे या उद्देशाने एकविरा फाउंडेशन व एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने खांडगाव-खांडेश्वर येथील सांस्कृतिक मंगल कार्यालयात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २५७ महिलांची कॅन्सरसह विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अश्विनी देशमुख, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विशाखा पाचोरे, डॉ. सुवर्णा मेहेत्रे, अविनाश आव्हाड, सोमनाथ गुंजाळ, सुविधा अरासिद्ध, किशोर साळुंखे तसेच विविध वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

शिबिरामध्ये सुमारे १५ हजार रुपये किमतीच्या कॅन्सर तपासण्या मोफत करण्यात आल्या. याशिवाय हिमोग्लोबिन, रक्तातील साखर (शुगर), मधुमेह तसेच महिलांच्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली. एकूण २५७ महिलांनी या सुविधेचा लाभ घेतला. तसेच युवक व ज्येष्ठ नागरिकांचीही विविध आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. थोरात यांनी सांगितले की, “वटसावित्री पौर्णिमा हा महिलांसाठी श्रद्धा आणि परंपरेचा महत्त्वाचा सण असला तरी त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. आहार, व्यायाम आणि वेळेवर तपासणी यामुळे कॅन्सरसारख्या आजारांवर यशस्वी उपचार शक्य आहेत. त्यामुळे महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी.”

दुर्गाताई तांबे यांनी सांगितले की, तपासणीत कोणताही आजार आढळल्यास संबंधित महिलांवर एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून पुढील उपचारांची व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे प्रत्येक महिलेने आरोग्य शिबिरात सहभागी होऊन तपासणी करून घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी डॉ. विशाखा पाचोरे, डॉ. अश्विनी देशमुख आणि डॉ. सुवर्णा मेहेत्रे यांनीही महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
