दुष्काळग्रस्त संगमनेरकरांना घरपट्टी-पाणीपट्टीत ५० टक्के सवलत द्या !
नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांची मागणी
संगमनेर प्रतिनिधी –
शासनाने संगमनेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सवलती आणि उपाययोजनांच्या माध्यमातून दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुष्काळाच्या झळा केवळ ग्रामीण भागापुरत्या मर्यादित नसून संगमनेर शहरातील सर्वसामान्य कुटुंबे, व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांनाही त्याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनाही दिलासा देण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेने चालू आर्थिक वर्षात घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये ५० टक्क्यांपर्यंत सवलत द्यावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी निवेदनामार्फत नगराध्यक्षांकडे केली आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाकडून विविध सवलती मिळत असताना शहरातील नागरिकांनाही अशाच प्रकारचा दिलासा मिळणे आवश्यक आहे. दुष्काळाचा परिणाम शहरातील व्यापारी, छोटे व्यावसायिक, नोकरदार आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या उत्पन्नावर होत असल्याने त्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार नगरपरिषदेने करावा, अशी भूमिका या मागणीमागे मांडण्यात आली आहे.

यासाठी संगमनेर शहरातील निवासी मालमत्ताधारकांना चालू आर्थिक वर्षासाठी घरपट्टीमध्ये ५० टक्क्यांपर्यंत, तर पाणीपट्टीमध्येही ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे. या सवलतीसंदर्भातील कायदेशीर तरतुदी तपासून नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत तातडीने प्रस्ताव मांडावा आणि त्याला मंजुरी द्यावी, असेही सुचविण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या अधिकारक्षेत्राबाहेरील बाबींसाठी जिल्हाधिकारी, नगर प्रशासन संचालनालय आणि नगरविकास विभागाकडे आवश्यक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दुष्काळी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना कोणत्या शासकीय सवलती लागू होऊ शकतात, याबाबत नगरपरिषदेने अधिकृत माहिती आणि कायदेशीर अभिप्राय सादर करावा, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दुष्काळाच्या संकटात ग्रामीण आणि शहरी असा भेद न करता सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची सामाजिक जबाबदारी आहे. दुष्काळाचा आर्थिक भार शहरातील कुटुंबांनाही सोसावा लागत असताना त्यांना करांच्या ओझ्यातून काही प्रमाणात दिलासा मिळणे गरजेचे आहे.
त्यामुळे संगमनेर नगरपरिषदेने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून घरपट्टी आणि पाणीपट्टीत ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे.

