अहिल्यानगर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी CSR कंपन्या, स्वयंसेवी संस्थांना सहकार्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
जिल्ह्यातील काही भागांत पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. या प्रयत्नांना बळ देण्यासाठी CSR निधी देणाऱ्या कंपन्या, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, फाउंडेशन, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींनी स्वेच्छेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, जलसंधारणाची कामे, नाला खोलीकरण व रुंदीकरण, गाळ काढणे, शेततळी आणि पाणीसाठवण संरचना उभारणे, तसेच विहीर व जलस्रोतांचे पुनर्भरण अशा कामांसाठी मदतीची आवश्यकता आहे.

याशिवाय, पशुधनासाठी पाणी व चारा उपलब्ध करून देणे, दुष्काळामुळे प्रभावित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य पुरविणे आणि आरोग्यविषयक मदत उपलब्ध करून देणे, या कामांमध्येही इच्छुक संस्थांनी योगदान द्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पाणीटंचाईची तीव्रता, स्थानिक गरजा आणि उपलब्ध संसाधने लक्षात घेऊन गावनिहाय मदतीचे स्वरूप निश्चित करण्यात येणार आहे. मदत करणाऱ्या संस्था व कंपन्यांना आवश्यक परवानग्या, शासकीय विभागांशी समन्वय, टंचाईग्रस्त भागांची माहिती आणि लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करणार आहे.
इच्छुक कंपन्या व संस्थांनी प्रस्तावित मदतीचे स्वरूप, निधी किंवा साहित्याचे प्रमाण, कार्यक्षेत्र आणि संपर्क व्यक्तीची माहिती जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मदतीसाठी येथे साधा संपर्क
मोबाईल : 7972889983
ई-मेल : csr.support.ahilyanagar@gmail.com
जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासह दुष्काळाच्या संभाव्य परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी सामाजिक संस्था, उद्योगसमूह आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा व प्रशासनाच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

