पंचनाम्यांत वेळ न घालवता दुष्काळग्रस्तांना सरसकट मदत करा : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – 

पठार भागातील दुष्काळी परिस्थितीची माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, पशुधनासाठी चारा आणि शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असून सरकारने पंचनाम्यांत वेळ न घालवता दुष्काळग्रस्तांना सरसकट भरीव मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हिवरगाव पठार, जांभुळवाडी, मांडवे, बिरेवाडी, कवठे मलकापूर, सुळकेवाडी, चौधरवाडी, कणसेवाडी, कुंभारवाडी, दरेवाडी, रणखांब आणि पिंपळगाव देपा या गावांमध्ये थोरात यांनी सोयाबीन, भुईमूग आणि बाजरी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी थोरात म्हणाले, की एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हाताशी आलेली पिके करपल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात आले आहे. चारा आणि पाण्याअभावी पशुधनाचा प्रश्न गंभीर झाला असून शेतीची कामे ठप्प झाल्याने शेतमजुरांनाही रोजगार मिळत नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच दुष्काळग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.

ग्रामीण भागातील अकुशल कामगारांचे वेतन आणि संजय गांधी निराधार योजनेचे लाभ अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. “केवळ घोषणा नकोत, ठोस निर्णय घेऊन त्यांची तातडीने अंमलबजावणी करा,” असे आवाहन त्यांनी केले.

सभापती शंकरराव खेमनर यांनीही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळत नसल्याबद्दल सरकारवर टीका केली. तर जयराम ढेरंगे यांनी बाळासाहेब थोरात नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे सांगितले.

पाहणीदरम्यान शेतकरी महिला आणि युवकांनी आपल्या अडचणी मांडल्या. काही महिलांना भावना अनावर झाल्या. थोरात यांनी त्यांना धीर देत शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची ग्वाही दिली.

या दौऱ्यावेळी सभापती शंकरराव खेमनर, बाळासाहेब सागर, मीराताई शेटे, जयराम ढेरंगे, सुजित खेमनर, सुदाम सागर यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक उपस्थित होते.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!