अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईचा भीषण विळखा !
३ लाख ३१ हजार नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून
१६१ गावांतील ९६१ वाड्या-वस्त्यांना १६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर बनले असून, तब्बल ३ लाख ३१ हजार २३३ नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील १६१ गावांमधील ९६१ वाड्या-वस्त्यांना १६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची आकडेवारी समोर आली आहे. उन्हाळ्यात याची तीव्रता अधिक वाढेल असे चित्र सध्या आहे.
जिल्ह्यातील सर्व १४ तालुके दुष्काळी घोषित असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत असेल, तर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष परिणाम किती प्रभावी ठरत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. कागदोपत्री नियोजन आणि प्रत्यक्षात नागरिकांना मिळणारे पाणी यामध्ये तफावत राहू नये, याची जबाबदारी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील पाणीटंचाईचे सर्वाधिक गंभीर चित्र पाथर्डी तालुक्यात दिसून येत आहे. येथे ६२ गावांतील ३५१ वाड्या-वस्त्यांना ७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. कर्जत तालुक्यात २७ गावांतील १९९ वाड्या-वस्त्यांसाठी २२ टँकर, तर शेवगाव तालुक्यात २८ गावांतील १६८ वाड्या-वस्त्यांसाठी २० टँकर कार्यरत आहेत.
नगर तालुक्यातील १९ गावांतील ९१ वाड्या-वस्त्यांना १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पारनेर तालुक्यात ४ गावांतील ३१ वाड्या-वस्त्यांसाठी ५ टँकर, संगमनेर तालुक्यात ८ गावांतील १६ वाड्या-वस्त्यांसाठी ७ टँकर, नेवासा तालुक्यात २ गावांतील १८ वाड्या-वस्त्यांसाठी २ टँकर, तर जामखेड तालुक्यात ६ गावांतील ७ वाड्या-वस्त्यांसाठी ८ टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात ४ गावांतील ४९ वाड्या-वस्त्यांना ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याची नोंद आहे. याशिवाय पारनेर नगर परिषद क्षेत्रातील १ गावातील ३१ वाड्या-वस्त्यांसाठी ८ टँकर कार्यरत असल्याचे अहवालात नमूद आहे.

जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी ४ शासकीय आणि १६५ खासगी अशा एकूण १६९ टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने टँकर सुरू असतानाही लाखो नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र चिंताजनक आहे.
टँकरची संख्या जाहीर करणे एवढ्यावरच प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. प्रत्येक टंचाईग्रस्त वाडी-वस्तीपर्यंत वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पाणी पोहोचते का, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पाळले जाते का, तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण होते का, याची प्रत्यक्ष पडताळणी होणे गरजेचे आहे.
राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर २६५ तालुके दुष्काळी घोषित केले असून, त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांचा समावेश असल्याचे प्रशासनाच्या माहितीत नमूद आहे.
दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्याबरोबरच प्रत्यक्ष परिस्थितीचा नियमित आढावा घेणे, तक्रारींवर तातडीने कारवाई करणे आणि हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे याबाबत दक्ष असणे हे महत्त्वाचे ठरेल अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

