दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क माफ करा ! आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
संगमनेर / प्रतिनिधी –
दुष्काळाच्या तीव्र संकटामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्चही पालकांसाठी मोठे आर्थिक आव्हान ठरत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शालेय, कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मासिक एस.टी. विद्यार्थी बस पासचे शुल्क १०० टक्के माफ करावे, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे.
याबाबत आमदार खताळ यांनी मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन निवेदन दिले.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच उच्च शिक्षणासाठी आपल्या गावातून तालुका, शहर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी दररोज एस.टी. बसने प्रवास करावा लागतो. अनेक गावांमध्ये शैक्षणिक सुविधा मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज मोठे अंतर पार करावे लागते. अशा विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बस ही सुरक्षित, नियमित आणि परवडणाऱ्या वाहतुकीचे प्रमुख साधन आहे.

मात्र, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती प्रतिकूल झाली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च कमी झाल्यास त्यांच्या पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. त्यामुळे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून परिवहन विभागाने विद्यार्थी बस पासचे शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी आमदार खताळ यांनी केली आहे.
शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येऊ नये
आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा आर्थिक भार कमी करणे आवश्यक आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील शालेय, कनिष्ठ महाविद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मासिक एस.टी. विद्यार्थी बस पास शुल्क १०० टक्के माफ करण्याचा शासन निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागीय नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणीही आमदार अमोल खताळ यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.

संगमनेर आगाराला २५ इलेक्ट्रिक बस मंजूर
संगमनेर आगारात इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी मागील आठवड्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी संगमनेर आगारासाठी २५ इलेक्ट्रिक ‘शिवाई’ एस.टी. बस देण्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी १० इलेक्ट्रिक बस गुरुवारी संगमनेर आगारात दाखल होणार आहेत. — अमोल खताळ, आमदार, संगमनेर
