संगमनेरच्या दूषित पाणीपुरवठ्याची गंभीर दखल

सांडपाण्याच्या स्रोतावर तातडीने उपाययोजना करा – पालकमंत्र्यांचे निर्देश

संगमनेर / प्रतिनिधी : 

संगमनेर शहरातून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या स्रोतामुळे पाणीपुरवठ्यात दूषित पाणी मिसळत असल्याच्या तक्रारीची पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गंभीर दखल घेतली. नगरपालिकेने आणि मुख्याधिकाऱ्यांनी यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच पाण्याच्या पुनर्वापराबाबत (Recycling) आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधीर बोराळे, संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासह पशुसंवर्धन व अन्य विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पीक विम्याबाबत टाळाटाळ खपवून घेणार नाही

पीक विम्याच्या बाबतीत कोणतीही टाळाटाळ किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. पिकांचे १०० टक्के पंचनामे पूर्ण करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता ग्रामविकास व महसूल विभागाने घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले.

अधिकाऱ्यांनी मुख्यालयात थांबून प्रत्यक्ष पाहणी करावी

कृषी, पशुसंवर्धन आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या मुख्यालयात उपस्थित राहून प्रत्यक्ष स्थळभेटी घ्याव्यात. त्यातून वस्तुस्थिती समजून घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. टंचाईच्या परिस्थितीत आवश्यक असणाऱ्या चारा डेपोबाबत तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आवश्यकता असलेल्या गावांबाबत सर्वेक्षण करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

पाणी, चारा व जलसंपदा योजनांचा आढावा

संगमनेर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती, पशुधनासाठी उपलब्ध असलेला राखीव चारा तसेच जलसंपदा विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. भोजापूर प्रकल्पाच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाबाबत सर्वेक्षण करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला देण्यात आले.

नादुरुस्त डीपी, ट्रान्सफॉर्मर तातडीने बदला

महावितरणने वीजपुरवठा खंडित होण्याचा कालावधी कमी करावा. तसेच नादुरुस्त डीपी आणि ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्याची कार्यवाही करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळेल, असे निर्देशही देण्यात आले.

पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य

जल जीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या मालदांड, जोरवे, वरवंडी, पाचगाव, निमोण यांसह अन्य गावांच्या पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. सद्यस्थितीत संगमनेर तालुक्यातील आठ गावे आणि १६ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भविष्यातील टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक गावाला महिनानिहाय किती पाण्याची आवश्यकता भासेल, याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले.

सर्व शेतीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा : आमदार खताळ

आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यातील सर्व शेतीचे पंचनामे विनाविलंब पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच वीजपुरवठा, चाऱ्याची उपलब्धता आणि पीक विम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता महसूल व कृषी विभागाने घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!