आमदार अमोल खताळ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
पंचनामे वेळेत पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
संगमनेर / प्रतिनिधी
पावसाने दिलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे संगमनेर तालुक्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, अनेक भागांत मका, सोयाबीन, बाजरीसह विविध पिके जळून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) साकूर पठार भागातील नुकसानग्रस्त शेतपिकांची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट, वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार अंतर्गत सुतारवाडी, पायरवाडी, कौठे मलकापूर, कुंभारवाडी, जांभूळवाडी आणि पिंपळगाव देपा परिसरातील शेतांमध्ये आमदार खताळ यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी नुकसानीची माहिती घेतली.
यावेळी तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रणजित ढेरंगे यांच्यासह महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना
आमदार खताळ म्हणाले की, पावसाने दिलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, या परिस्थितीची शासनाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे कोणतेही निकष किंवा भेदभाव न करता सरसकट पंचनामे करण्यात यावेत. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याची सविस्तर यादी तयार करून त्यातून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. महसूल, कृषी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पंचनाम्याची प्रक्रिया पारदर्शक आणि वेगाने पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाकडे लवकरात लवकर सादर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.

दिवाळीपर्यंत मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्यात येईल. शासनाच्या मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. दिवाळीपर्यंत नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल,” असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
