सरकार आणतंय पैशाचा आव अन् जनता मात्र उपाशी !

दुष्काळात पंचनाम्यांचा टाईमपास नको – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर प्रतिनिधी –

राज्यात यंदा दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे, तर रब्बी हंगामाचीही शक्यता उरलेली नाही. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि शेतमजुरांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारकडे पैशाचा आव असून जनता मात्र उपाशी राहत आहे. संजय गांधी निराधार योजनेचे पैसेही लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे पंचनाम्यांचा टाईमपास न करता शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना मदत करावी, अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ६० व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांसाठी पशुधन हे लक्ष्मीसमान असून, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत जनावरांची होणारी परवड पाहवत नसल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने रोजगार हमीची कामे सुरू करण्यासह चारा छावण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यात साखर कारखान्यांची संख्या वाढली असून कमी दिवसांत अधिक गाळप करण्यासाठी कारखान्यांनी क्षमता वाढवली आहे. मात्र, उसाचे प्रमाण कमी होत असल्याने कारखान्यांमध्ये उसासाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण करणारी साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याने सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगारांचे हित कायम जपले आहे. कारखान्याच्या ९,००० मेट्रिक टन क्षमतेच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, यंदा ११ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यंदाचा दुष्काळ कोरोनाप्रमाणे संकट असल्याचे सांगत काटकसर आणि मेहनतीच्या माध्यमातून सर्वांची दिवाळी आनंदात साजरी करण्याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना यंदाही चांगला भाव मिळणार असून, त्यांना २०० रुपयांचे विशेष अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच, कारखान्याच्या कामगारांना दिवाळीनिमित्त २० टक्के बोनस आणि ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याने सभासद, शेतकरी आणि कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले असून, ऑफ सीजनमधील कामे वेळेत पूर्ण करण्यात आली आहेत. विस्तारीकरणाचे कामही वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, इंद्रजीत थोरात, शरद नाना थोरात, रामहरी कातोरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले यांनी केले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!