1 हजार हून अधिक वाहनांतून 12 हजार शेतकऱ्यांचा मुंबईच्या दिशेने लाँग मार्च !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली अकोले येथून मुंबईच्या दिशेने भव्य राज्यव्यापी वाहन लाँग मार्च सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील २० हून अधिक जिल्ह्यांतील १,००० हून अधिक वाहनांतून १२ हजारांपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याकडे निघालेल्या या मोर्चाचा मुक्काम आज रात्री इगतपुरीजवळील घाटणदेवी येथे असणार आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
– दुष्काळी मदत : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी नुकसानभरपाई द्यावी आणि पीकविमा भरपाईतील अडथळे दूर करावेत.
– कर्जमाफी : दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही द्यावा.
– जमिनीचे हक्क : वनजमिनी, देवस्थान ट्रस्ट, इनाम आणि गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे जमिनीचे हक्क नोंदवावेत.
– योजना कर्मचाऱ्यांचे प्रश्न : पेसा, बांधकाम, पोषण आहार, आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात.
– नमो शेतकरी योजना : थकीत दोन हप्ते तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करावेत.
– लाडकी बहीण योजना : ई-केवायसीमुळे वगळण्यात आलेल्या ८१ लाख महिलांना पुन्हा योजनेत समाविष्ट करून थकीत मानधन द्यावे.

नोटिसांना न जुमानता आंदोलन सुरू
२१ ते २६ ऑक्टोबरदरम्यान अकोले येथे महामुक्काम सत्याग्रह केल्यानंतरही मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने किसान सभेने मुंबईकडे कूच केली आहे. सरकारने पोलिसांमार्फत नोटिसा बजावून मोर्चाला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
दिग्गज नेत्यांचा सहभाग
मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रीय महासचिव डॉ. विजू कृष्णन, राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, माकपचे आमदार विनोद निकोले, राज्य अध्यक्ष यशवंत झाडे आणि राज्य सचिव उमेश देशमुख यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील वाहनांचा ताफा माजी आमदार जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली घोटी येथे मोर्चात सहभागी झाला.
उद्या कसारा घाटातून मुंबईच्या दिशेने मोर्चा पुढे जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य कराव्यात, अशी किसान सभेची मागणी आहे. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

