आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मलबार हिल पोलिसांची नोटीस ; कॉम्रेड अजित नवले यांना कायदेशीर कारवाईचा इशारा !

संगमनेर प्रतिनिधी –

लाडकी बहीण योजनेचे अनुदान KYC प्रक्रियेमुळे बंद झाल्याचा आरोप करत जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली २६ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्यमंत्री यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन किंवा मोर्चा करण्याचा इशारा देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मलबार हिल पोलीस ठाण्याने राज्य सिक्रेटरी, केंद्रीय कमिटी सदस्य अजित सुभाष नवले यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश देत कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंडलिक गाढवे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ अंतर्गत ही नोटीस बजावली आहे. 

नोटिशीनुसार, मुंबई उच्च न्यायालयातील रिट पिटिशन मधील आदेशांचा संदर्भ देत मलबार हिल, दक्षिण मुंबई येथे कोणत्याही वैयक्तिक किंवा सामूहिक आंदोलन, निदर्शन, धरणे, घोषणाबाजी, मोर्चा, रॅली, बॅनर लावून निदर्शने, गर्दी जमवणे किंवा इतर कार्यक्रमांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याबाबत पोलिसांनी सूचना दिल्या आहेत.

तसेच, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(३) अन्वये पोलीस उपायुक्तांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा उल्लेखही नोटिशीत करण्यात आला आहे.

आझाद मैदानावर मागण्या मांडण्याचे निर्देश

नोटिशीत अजित नवले यांना मलबार हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत, वर्षा बंगला, मलबार हिल, मुंबई तसेच इतर शासकीय निवासस्थानांसमोर कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल असे कृत्य न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे जावे, असेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.

नोटिशीचा भंग झाल्यास किंवा प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंडलिक गाठवे यांनी नमूद केले आहे. नोटीस ही संबंधित घटनेच्या नोंदीत पुरावा म्हणून वापरली जाऊ शकते, याचीही नोंद घेण्यास सांगण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अनुदानासंदर्भातील प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेण्यात आली असताना पोलिसांनी बजावलेल्या या नोटिशीमुळे आंदोलनाच्या नियोजित स्वरूपाबाबत आणि पुढील भूमिकेबाबत लक्ष लागले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!