लोकप्रतिनिधी कुणाच्या तरी नियंत्रणाखाली ;
पाणी – वीज – रेल्वे प्रश्नांवर माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
वाळू – मुरुमापलीकडे विचारच नाही ; वीज घालवून पाणी पळवले जात आहे….
संगमनेर / प्रतिनिधी :
पाणी, वीज आणि रेल्वे हे तालुक्याच्या विकासाशी निगडित अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. मात्र, या मूलभूत प्रश्नांवर येथील लोकप्रतिनिधींनी ठामपणे आवाज उठविला पाहिजे. ते कुणाच्यातरी नियंत्रणाखाली काम करत असल्याने तालुक्याच्या प्रश्नांवर बोलू शकत नाहीत, हे संगमनेर तालुक्याचे दुर्दैव आहे, असा घणाघाती आरोप राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, दुर्गाताई तांबे, रणजीत सिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, शरद नाना थोरात, कारखान्याचे संचालक संतोष हासे, इंद्रजीत भाऊ थोरात, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, डॉ. तुषार दिघे, विनोद हा, सतीश वर्पे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ अरगडे, विजय राहणे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजने, दिलीप नागरे, लताताई गायकर, सुंदराबाई डूबे, बंडू नाना भाबड, मदन आंबरे तसेच कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते.
थोरात म्हणाले, “आमच्या काळामध्ये सलग अकरा तास पूर्ण दाबाने वीज मिळायची. आता मात्र विजेचा खेळखंडोबा झाला आहे. वीज घालवून पाणी पळवले जात आहे.” तालुक्यातील पाणी, वीज आणि रेल्वे या मूलभूत प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी बोलणे अपेक्षित आहे. मात्र, त्याऐवजी ते केवळ वाळू आणि मुरुमाच्या प्रश्नांपलीकडे विचारच करू शकत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

संगमनेरच्या पाण्यासाठीच्या संघर्षाचा इतिहास सांगताना थोरात म्हणाले की, १९८५ मध्ये जनतेने हक्काच्या पाण्यासाठीच आम्हाला निवडून दिले. सलग आठ वेळा मोठ्या मताधिक्याने विजयी केल्यानंतर कोणाचीही मदत न घेता निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम पूर्ण केले.
आता कालव्यांचे काँक्रिटीकरण करून पाणी पुढे नेले जात आहे. पाण्यामुळेच समृद्धी निर्माण होते. सहकाराच्या माध्यमातून शेतकरी, नोकरदार आणि व्यापारी वर्गाला मोठी आर्थिक ताकद मिळाली असून राज्यातील पहिल्या पाच तालुक्यांमध्ये संगमनेरचा समावेश होतो, असेही त्यांनी सांगितले. “पाण्यामुळे समृद्धी येत आहे. त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी आणि सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा संघर्षासाठी तयार राहावे लागेल,” असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील जनतेला केले.

सहकार क्षेत्रावरून टीका करणाऱ्यांवरही थोरात यांनी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “ज्यांनी आयुष्यात कधी एक लिटर दूध उत्पादित केले नाही, जे उसाचे एक टिपरू पिकवत नाहीत आणि जे कारखान्याचे सभासदही नाहीत, ते आज सहकार उध्वस्त करण्याची भाषा करत आहेत.”
“काही लोक सातत्याने मोबाईलवर अफवा आणि गैरसमज पसरवण्यात मग्न आहेत. जिथून लिहून येते, त्यांच्याविरोधात हे बोलू शकत नाहीत; कारण तसे केल्यास त्यांचे ‘दाणापाणी’ बंद होईल,” असा टोला त्यांनी लगावला.
उठसूट पत्रकार परिषदा घेणारे लोक तालुक्याच्या वीज, पाणी आणि रेल्वेसारख्या मूलभूत प्रश्नांवर मात्र पूर्णपणे गप्प आहेत, अशी टीका थोरात यांनी केली. यावेळी त्यांनी यंदा सहकारी साखर कारखाना आणि दूध संघ सर्वांची दिवाळी गोड करणार, असेही सांगितले.
