“तुम्ही माझ्या आमदारकीची काळजी करू नका!”
आ. अमोल खताळांचा विरोधकांवर पलटवार; ‘पराभव अजूनही पचलेला नाही’
संगमनेर / प्रतिनिधी :
“तुम्ही माझ्या आमदारकीची काळजी करू नका. जनतेने मला निवडून दिले आहे. त्यामुळे न्यायालयातही मला न्याय मिळेल,” असा थेट इशारा देत आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांवर पलटवार केला. आपला पराभव काहींना अद्याप पचलेला नसून, आपल्याला त्रास देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
जनसंपर्क कार्यालयात माध्यमांशी बोलताना खताळ यांनी, “कॅमेऱ्यासमोर एक बोलायचे आणि पडद्यामागे वेगळी भूमिका घ्यायची, हे काहींचे काम आहे,” असा टोला लगावला.

संगमनेर शहरातील विकासकामांचा उल्लेख करताना त्यांनी महायुती सरकारनंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाल्याचे सांगितले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यासाठी निधी दिला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या विकासासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा दावा त्यांनी केला. रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातील ताईत म्हणून माझी ओळख आहे, याचे काहींना दुःख झाले आहे. पूर्वी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी तुमच्या ओळखी होत्या; मग त्यातून काय केले?” असा सवाल करत त्यांनी विरोधकांच्या राजकीय भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आपण विधानसभेत आवाज उठविल्याने काहींना त्रास होत असल्याचे सांगत खताळ म्हणाले, “मला त्रास देण्याचा प्रयत्न करणारे हतबल झाले आहेत. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयातही मला न्याय मिळेल.”
आमदार सत्यजित तांबे यांनी नाव न घेता “दोन ते तीन महिने काय करायचे ते करून घ्या,” अशी टीका केली होती. त्यावर खताळ यांनी प्रत्युत्तर देताना, “माझ्या आमदारकीची काळजी करू नका. जनतेने मला निवडून दिले आहे,” असे ठणकावले. तसेच “झालेला पराभव काहींना अद्याप पचलेला नाही,” असा टोला लगावला.
