घारगावात अवैध वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा !

आरोपी पकडला ; १० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त – वाहनमालक फरार

संगमनेर प्रतिनिधी : 

घारगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ढंपरवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, ढंपरसह वाळू असा एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, साकूर ते पिंपळगाव देपा रस्त्याने एका ढंपरमधून अवैध वाळूची वाहतूक केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने पिंपळगाव देपा येथील खंडोबा मंदिराजवळ सापळा रचला. संशयित ढंपरची तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली. यावेळी चालक प्रशांत सुनिल पवार (वय २१, रा. मांडवे बु., ता. संगमनेर) याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच वाहनमालक शिवराज ज्ञानेदव खेमनर (रा. साकूर, ता. संगमनेर) याच्या सांगण्यावरून वाळू वाहतूक करत असल्याचे त्याने सांगितले. वाहनमालक सध्या फरार आहे.

या कारवाईत १० लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ढंपर (एमएच-४२-बीएफ-२५२०) आणि २० हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) तसेच पर्यावरण कायदा कलम ३, १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास घारगाव पोलीस करीत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!