जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा !
आठ आरोपी ताब्यात ; ३ लाख ४४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
राहुरी तालुक्यातील गंगापूर शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, पाच मोबाईल आणि पाच मोटारसायकली असा एकूण ३ लाख ४४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एलसीबीचे पथक राहुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना, गंगापूर गावच्या शिवारातील एस. के. पेपर मिल कंपनीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये पैसे लावून जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन खात्री केली असता काही जण गोलाकार बसून जुगार खेळताना आढळले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ज्ञानेश्वर पुंजा पवार, अनिल दत्तात्रय होडगर, चिमा खंडू वडीतके, बाळासाहेब विठ्ठल तुपे, मनोहर रामदास नान्नोर, किरण साहेबराव होण, विठ्ठल बाळासाहेब चितळकर आणि रामदास रावजी नान्नोर यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून ४ हजार ७१० रुपये रोख, ९० हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल आणि २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली, असा एकूण ३ लाख ४४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०२२/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व कारवाई राहुरी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
