संगमनेर, कोपरगाव मधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस

दोन सराईत आरोपी ताब्यात ; ५ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – 

संगमनेर आणि कोपरगाव शहरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटनांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून चोरीच्या सोन्याची ३० ग्रॅम वजनाची लगड तसेच गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा एकूण ५ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. ४ सप्टेंबर रोजी निलम अजितकुमार नय्यर (वय ५८, रा. धारणगाव रोड, कोपरगाव) या मुलीसह स्कुटीवरून श्रीराम पार्क, कोपरगाव येथे जात असताना दोन अज्ञात आरोपींनी मोपेडने त्यांच्या स्कुटीला धक्का दिला. यामध्ये त्या व त्यांची मुलगी खाली पडल्या. त्यानंतर आरोपींनी मुलीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी लोणी परिसरातून दिप भटु सातपुते (वय २४, रा. तळेगाव रोड, भिलहाट, लोणी) आणि त्याचा साथीदार मयुर संजय ब्राम्हणे (वय २४, रा. वेताळबाबा चौक, लोणी खुर्द) यांना ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींनी ४ सप्टेंबर रोजी श्रीराम पार्क, कोपरगाव येथे तसेच त्यापूर्वी १० ते १२ दिवस संगमनेर शहरातील एचडीएफसी बँकेसमोरून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार कोपरगाव शहर पोलीस ठाणे गुन्हा क्र. ४८८/२०२६ आणि संगमनेर शहर पोलीस ठाणे गुन्हा क्र. ८२२/२०२६ हे गुन्हे उघडकीस आले.

आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने सोनाराकडे विकल्याचे तपासात समोर आले. संबंधित सोनाराने त्या दागिन्यांची ३० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड तयार करून ती मित्राकडे ठेवली असल्याची माहिती दिल्यानंतर पंचांसमक्ष ४ लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली ६५ हजार रुपये किमतीची होंडा मोपेड (एमएच-१७-जीपी-६८६२) जप्त करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून दिप सातपुते याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी दोन, तर मयुर ब्राम्हणे याच्यावर एक गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!