अवैध सावकारी करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
दोन कोटींच्या कर्जापोटी १८ कोटी ३८ लाखांची मागणी केल्याचा आरोप
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
अवैध सावकारी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सुरेश मोतीलाल कांकरिया (वय ६४, रा. विराज कॉलनी, तारकपूर) आणि विनय गुरुलिंग होनराव (वय ५५, रा. होनराव वाडा, डावरे गल्ली, अहिल्यानगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, आगरकर मळा परिसरातील ७७ वर्षीय दत्तात्रय जगन्नाथ आगरकर यांनी २०१६ पासून वेळोवेळी जमीन तारण ठेवून सुरेश कांकरिया यांच्याकडून तब्बल २ कोटी रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर फिर्यादीने आरोपींना मुद्दल व व्याजापोटी एकूण ३ कोटी ७५ लाख रुपये परत केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मात्र, तारण ठेवलेली जमीन परत न करता आरोपींनी अवैधरीत्या जास्त व्याजावर व्याज आकारून फिर्यादीकडे १८ कोटी ३८ लाख १४ हजार ६९५ रुपये मागितल्याचा आरोप आहे. तसेच यामुळे मानसिक त्रास दिल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (२), (३), (४), (५), ३१८ (४), ३५१ (२), (३), ३ (५) तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमातील कलम ३१, ३९, ४४, ४५, ४८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार संदिप पवार, विजय ठोंबरे, सतीष भवर व महिला पोलीस अंमलदार किरण ठुबे यांचे पथक तयार केले.
७ सप्टेंबर रोजी पथकाने तारकपूर परिसरात आरोपींचा शोध घेतला असता दोन्ही आरोपी मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
