बदनामीच्या षड्यंत्रावर आमदार अमोल खताळ यांचा घणाघात ; कायदेशीर कारवाईचा इशारा
संगमनेरमध्ये राजकीय वातावरण तापले
संगमनेर प्रतिनिधी –
“मी कायद्याचा सन्मान करतो म्हणून आतापर्यंत शांत होतो. मात्र, संगमनेर तालुक्याचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेले असून विनाकारण माझी बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. आता मी शांत बसणार नाही,” असा आक्रमक इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे. सोमवारी (दि. ७) आपल्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणामागे असणाऱ्या राजकीय सूत्रधारांचा पर्दाफाश करण्याचा निर्धार व्यक्त केला.
आमदार खताळ यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुख्य मुद्दे
* ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ची पोस्ट अत्यंत गंभीर: सामाजिक माध्यमांतून सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत, खांडगाव येथील प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ या व्यक्तीच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावून गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका लोकप्रतिनिधीच्या विरोधात भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट टाकणे ही अत्यंत गंभीर बाब असून, पराभव जिव्हारी लागल्यामुळेच विरोधकांकडून हे उद्योग सुरू असल्याचे ते म्हणाले.
* आर्थिक व्यवहारांशी संबंध नाही: संबंधित व्यक्तीशी आपला कोणताही वैयक्तिक किंवा आर्थिक व्यवहार नाही. मला कोणालाही एक रुपया देणे नाही आणि कोणाकडून घेणेही नाही, असे खताळ यांनी ठामपणे सांगितले. संबंधित व्यक्ती शेअर बाजारात आर्थिक अडचणीत सापडली असून, हा प्रकार मी आमदार होण्यापूर्वीचा आहे; मात्र मला बदनाम करण्यासाठीच मी आमदार झाल्यावर तो उकरून काढण्यात आला आहे.

* पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह: पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेत खताळ म्हणाले, “संबंधित व्यक्तीच्या हालचालींची माहिती असूनही वेळेवर कारवाई का झाली नाही? माझे खांडगाव येथे जाणे पोलिसांना माहीत असतानाही त्याला ताब्यात का घेतले गेले नाही? पोलिसांची गोपनीय शाखा नेमके काय करत आहे, याची चौकशी झाली पाहिजे.”
* सखोल चौकशी व मुख्यमंत्र्यांची भेट: संबंधित व्यक्तीचे मोबाईल फोन ताब्यात घेऊन त्याचे सर्व कॉल डिटेल्स (CDR) तपासण्यात यावेत, कारण त्याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. या संपूर्ण षड्यंत्रामागे राजकीयदृष्ट्या कोण कोण आहे, याचा शोध मी घेतला असून या प्रकरणी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“माझे कार्यकर्ते माझ्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत, तरीही मी कायद्याच्या चौकटीत राहूनच या अन्यायाविरुद्ध लढा देणार आहे,” असे सांगत आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांना कडक इशारा दिला आहे.
