संगमनेरात सध्या ‘पोरकटपणाचे’ राजकारण ; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा विरोधकांना टोला

संगमनेर प्रतिनिधी –

निवडणुकीनंतर संगमनेरात राजकारण करण्याची परंपरा कधीच राहिलेली नाही. मात्र, सध्या सुरू असलेले राजकारण हे ‘पोरकटपणाचे आणि दुर्दैवी’ असल्याची टीका माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. संगमनेर नगरपरिषदेने मागील आठ महिन्यांत चांगली कामगिरी केली असून नागरिकांना सुविधा देण्यासोबतच दर्जेदार विकासकामांना प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील २०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि फूड कोर्टचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी आमदार सत्यजित तांबे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई मालपाणी, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, डॉ. सुधीर तांबे नगराध्यक्ष झाल्यापासून संगमनेर शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. त्यानंतर नगरपरिषदेने अनेक प्रश्न सोडविले आहेत. निळवंडे धरणाचे दोन्ही कालवे आणि थेट पाइपलाइनमुळे शहराला मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. मागील आठ महिन्यांत नगरपरिषदेच्या नव्या टीमनेही चांगले काम केले आहे.

“निवडणुकीनंतर संगमनेरात कधीही राजकारण केले जात नव्हते. ही आपली परंपरा नाही. मात्र, सध्या पोरकटपणा सुरू झाला आहे,” असे थोरात म्हणाले. शहरातील सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, चांगले रस्ते आणि भूमिगत विद्युत जाळे यावरही आगामी काळात भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने २०० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाल्याचे सांगत, या यंत्रणेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेस मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या कार्यक्रमाला पोलिसांची उपस्थिती नसल्याबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

‘न आणलेल्या निधीचे श्रेय घेऊ नका’

आमदार सत्यजित तांबे यांनी विरोधकांवर निशाणा साधताना सांगितले की, शहरात अत्याधुनिक दर्जाचे २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समिती व पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निधी मिळाला असून त्यांचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.

“निधी कसा आणायचा हे आम्हाला चांगले माहित आहे. न आणलेल्या निधीचे आणि न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नका,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. शहरातील विकासकामांना अडथळा न आणता सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

तसेच माहितीच्या अधिकाराच्या नावाखाली काही लोकांकडून ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरू असल्याचा आरोप तांबे यांनी केला. शहरातील ११ चौकांमध्ये माहिती देणारे स्पीकर बसविण्यात आले असून आगामी काळात धुळमुक्त शहरासाठी मशीन घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर पुतळा व शहीद स्मारक

संगमनेर हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यासाठी परिवहन विभागाकडून जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. या ठिकाणी भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. यासोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, तिरंगा ध्वज आणि शहीद स्मारक उभारण्यात येणार असल्याचे आ. सत्यजित तांबे यांनी सांगितले.

या स्मारकांच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या श्रेयवादावरही टीका केली. यावेळी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्मारकांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले. संग्राम पतसंस्थेच्या वतीने या स्मारकांसाठी ५ लाख रुपयांची लोकवर्गणी लोकवर्गणी देण्यात आली.

नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी नगरपरिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महिला सुरक्षेसाठी रक्षक दल, भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि ई-टॉयलेटची सुविधा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर’ या उद्देशाने काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!