अहिल्यानगर जिल्ह्यातील ७८ टक्के तलाव दुष्काळाच्या विळख्यात !

मत्स्यव्यवसायासमोर मोठे संकट ; गाळ काढण्याची विशेष मोहीम अहिल्यानगरमधून सुरू होणार

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क : 

जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थितीचे गंभीर परिणाम आता जलसाठ्यांसह मत्स्यव्यवसायावरही दिसू लागले आहेत. पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील एकूण ७४ तलावांपैकी तब्बल ५८ तलाव दुष्काळाच्या प्रभावाखाली आले असून, हे प्रमाण सुमारे ७८ टक्के आहे. विशेष म्हणजे, तब्बल ४५ तलावांमधील उपयुक्त पाणीसाठा पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम अहिल्यानगर जिल्ह्यातून सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत एकूण ७४ तलाव असून, त्यांचे एकूण जलक्षेत्र १० हजार ७२२ हेक्टर आहे. या तलावांवर जिल्ह्यातील ३ हजार ११६ मच्छीमार सभासदांचा व्यवसाय अवलंबून आहे. दरवर्षी १४७ लाख मत्स्यबोटुकली संचयनाचे उद्दिष्ट ठेवले जाते, तर ७ हजार ६६८ मेट्रिक टन मत्स्योत्पादन अपेक्षित असते. मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने या व्यवसायाचे गणितच बिघडवले आहे.

सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात २ हजार ७२ मेट्रिक टन मत्स्योत्पादन झाले होते. मात्र, सप्टेंबर २०२६ अखेर यंदाचे मत्स्योत्पादन केवळ ४७९ मेट्रिक टनांवर आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत मत्स्योत्पादनात झालेली ही मोठी घट तलावांमधील घटत्या पाणीसाठ्याचा मत्स्यव्यवसायावर होत असलेला गंभीर परिणाम अधोरेखित करते.

४५ तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शून्य!

पाटबंधारे विभागाच्या २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पाणीपातळी अहवालानुसार, जिल्ह्यातील ४५ तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के आहे. दोन तलावांमध्ये १ ते १० टक्के, चार तलावांमध्ये १० ते ३० टक्के, सहा तलावांमध्ये ३१ ते ५० टक्के, एका तलावामध्ये ५१ ते ७० टक्के, तर १६ तलावांमध्ये ७१ ते १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

एकूण ७४ तलावांपैकी केवळ १६ तलावांमध्ये ७१ ते १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बहुतांश तलावांमधील मत्स्यसंवर्धन आणि मत्स्यउत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

दुष्काळावर मात करण्यासाठी तलावांतील गाळ काढणार !

दरम्यान, या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविण्याची गरज मंत्री नितेश राणे यांनी अधोरेखित केली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून राज्यातील तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेची सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यातून करण्याचे नियोजन करावे, अशी सूचना मंत्री राणे यांनी केली आहे.

तलावांतील गाळ काढल्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच काढलेला गाळ शेतजमिनींमध्ये वापरल्यास जमिनीची सुपीकता वाढण्यास हातभार लागणार आहे. परिणामी जलसाठ्यांचे संवर्धन, शेतीला लाभ आणि मत्स्यव्यवसायाला चालना असे तिहेरी फायदे या मोहिमेतून साध्य होऊ शकतात.

या मोहिमेचा सविस्तर आराखडा तयार करून प्रत्येक कामाचे सूक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले आहे. तलावांतील गाळ काढण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून आगामी काळात मच्छीमार संस्थांना मत्स्यपालनासाठी अधिक अनुकूल परिस्थिती उपलब्ध होईल, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

जामखेड आणि पारनेरमध्ये सर्वाधिक तलाव

जिल्ह्यातील तालुकानिहाय तलावांची संख्या पाहता अहिल्यानगर तालुक्यात १०, कर्जत ९, जामखेड ११, पाथर्डी ७, पारनेर ११, राहुरी ३, श्रीगोंदा ८, श्रीरामपूर २, संगमनेर ९ आणि अकोले तालुक्यात ४ तलाव आहेत. जामखेड आणि पारनेर तालुक्यांत प्रत्येकी सर्वाधिक ११ तलाव आहेत.

एकीकडे पाणीसाठ्याने तळ गाठला असताना दुसरीकडे मत्स्योत्पादनात झालेली घट मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनवणारी आहे. जिल्ह्यातील ३ हजार ११६ मच्छीमार सभासदांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत तलावांतील गाळ काढण्याची प्रस्तावित विशेष मोहीम प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबविली जाते आणि त्यामुळे जलसाठा व मत्स्यव्यवसायाला किती दिलासा मिळतो, याकडे जिल्ह्यातील शेतकरी आणि मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!