ऊस दराबाबत कारखाना संचालक मंडळांनी आठवडाभरात निर्णय घ्यावा !

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश ; ९ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याची मुदत

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस दरासह विविध मागण्यांबाबत साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांनी सकारात्मक भूमिका घेऊन येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. तसेच कारखान्यांतील वजनकाट्यांची संयुक्त पथकामार्फत तपासणी आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सन २०२६-२७ च्या ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध मागण्या व अडचणी जाणून घेण्यात आल्या.

ऊस दर आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत कारखाना व्यवस्थापनाने सकारात्मक विचार करावा. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांनी स्वतंत्र बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करावी आणि ९ नोव्हेंबरपर्यंत ठोस निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

वजनकाट्यांची संयुक्त पथकामार्फत तपासणी

कारखान्यांतील वजनकाट्यांच्या अचूकतेबाबत शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांची दखल घेत प्रशासनाने वजनकाट्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तहसीलदार आणि वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक नियुक्त करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या तपासणीवेळी शेतकरी अथवा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वजन प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.

तक्रार निवारणासाठी स्वतंत्र केंद्र

गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन त्यावर योग्य तोडगा काढण्यात येईल, असेही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात समन्वय राखून प्रश्न सोडविणे ही शासनाची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांचा सकारात्मक विचार करून सर्व संबंधित घटकांच्या सहकार्याने मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपमहापौर धनंजय जाधव, प्रादेशिक उपसंचालक (साखर) संजय गोंदे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!