अमृतवाहिनी विद्यापीठाची भविष्यवेधी भरारी ; कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीचे दोन नवीन अभ्यासक्रम सुरू !
संगमनेर प्रतिनिधी :
शिक्षण, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण करण्याच्या दिशेने अमृतवाहिनी विद्यापीठाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. विद्यापीठात बी.टेक. आणि एम.टेक. कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या दोन नवीन अभ्यासक्रमांचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना कॉस्मेटिक उद्योग, संशोधन, उत्पादन निर्मिती आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

लोकनेते तथा माजी शिक्षणमंत्री आणि विद्यापीठाचे कुलपती ना. बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली विद्यापीठाची ही शैक्षणिक वाटचाल सुरू असून, आगामी काळात बायोइंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी आणि ऑटोमेशन अँड रोबोटिक्स यांसारखे आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे.
नवीन अभ्यासक्रमांचा शुभारंभ अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त व सचिव सौ. शरयू देशमुख, विश्वस्त श्री. अनिल शिंदे, ॲडमिनिस्ट्रेशन हेड डॉ. एस. के. निंबाळकर, विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. आर. बी. सातपुते, रिसर्च हेड डॉ. जे. बी. गुरव, स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसचे डीन डॉ. एम. जे. चव्हाण आणि विविध विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आला. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून नियमित शैक्षणिक कामकाजाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी डॉ. एम. जे. चव्हाण यांनी कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाचे स्वरूप, शैक्षणिक संधी आणि भविष्यातील रोजगाराच्या विविध पर्यायांची माहिती दिली. डॉ. एस. के. निंबाळकर यांनी १९७८ पासून अमृतवाहिनी संस्थेने केलेल्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत संस्थेने उभारलेला शैक्षणिक विस्तार आणि विद्यापीठ स्थापनेमागील संकल्पना त्यांनी स्पष्ट केली.
रजिस्ट्रार डॉ. आर. बी. सातपुते यांनी कॉस्मेटिक उद्योगाच्या वाढत्या व्याप्तीवर प्रकाश टाकला. सौंदर्यप्रसाधनांच्या वाढत्या वापरामुळे या उद्योगात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत आहेत. नवीन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॉस्मेटिक उत्पादनांची निर्मिती, संशोधन व विकास, गुणवत्ता नियंत्रण, औद्योगिक उत्पादन आणि उद्योजकता या क्षेत्रांत करिअर करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शरयू देशमुख यांनी पालकांनी अमृतवाहिनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यापीठाच्या स्थापनेपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास उलगडताना त्यांनी दूरदृष्टी, सातत्यपूर्ण प्रयत्न, नियोजन आणि सामूहिक योगदानाच्या बळावर शैक्षणिक स्वप्ने प्रत्यक्षात साकार होऊ शकतात, याचे अमृतवाहिनी विद्यापीठ हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले.
गेल्या पाच दशकांपासून अमृतवाहिनी संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळखली जाते. संस्थेचे विद्यार्थी शिक्षण, उद्योग, संशोधन, प्रशासन, कॉर्पोरेट क्षेत्र आणि उद्योजकतेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. या समृद्ध शैक्षणिक वारशाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील आव्हानांसाठी सज्ज करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाच्या उभारणीमध्ये डॉ. एस. के. निंबाळकर, डॉ. आर. बी. सातपुते, सरस्वती टीम आणि डॉ. रोहित डुबे-पाटील यांचे विशेष योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे त्यांनी कौतुक केले.

आता एआय, सायबर सिक्युरिटी आणि रोबोटिक्सवर भर
विद्यापीठाच्या आगामी शैक्षणिक विस्तारामध्ये बायोइंजिनिअरिंग या अभ्यासक्रमासह स्कूल ऑफ इंजिनिअरिंगअंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग यांसारखे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. स्कूल ऑफ बायोफ्युएल इंजिनिअरिंगअंतर्गतही नवीन शैक्षणिक संधी निर्माण करण्याचे नियोजन आहे. बदलत्या औद्योगिक गरजा आणि जागतिक रोजगार बाजारपेठेतील संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान, प्रत्यक्ष प्रशिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकास उपलब्ध करून देण्यावर विद्यापीठाचा भर राहणार आहे.
केवळ पदवी प्रदान करणे एवढेच विद्यापीठाचे उद्दिष्ट नसून ज्ञान, कौशल्य, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेच्या माध्यमातून आत्मनिर्भर व जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणारी युवा पिढी घडविण्याचा विद्यापीठाचा संकल्प आहे. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील दरी कमी करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासोबतच स्वयंरोजगार व संशोधनासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण विद्यापीठाने स्वीकारले आहे.

या नव्या शैक्षणिक उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व विद्यापीठाचे कुलपती बाळासाहेब थोरात, विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, अनिल शिंदे आणि कार्यकारी विश्वस्त व सचिव शरयू देशमुख यांनी अधिकारी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. महेश खताळ यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले. सूत्रसंचालन प्रा. रुपाली दवंगे यांनी केले, तर डॉ. ए.बी. जगनर यांनी आभार मानले.



![]()
