सावित्रीबाईंच्या शैक्षणिक वारशाची शाळा वाचविण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा !
सिंथिया फॅरार ते क्लेरा ब्रुस… स्त्रीशिक्षणाच्या ऐतिहासिक ठेव्याचे भवितव्य टांगणीला
शाळेला ‘आदर्श मॉडेल स्कूल’चा दर्जा देण्याची मागणी
अहिल्यानगर | भैरवनाथ वाकळे
एखादी शाळा म्हणजे केवळ चार भिंती, वर्गखोल्या आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती नव्हे, तर अनेक पिढ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे संस्कारकेंद्र असते. विशेषतः ज्या शाळेच्या इतिहासाचे धागे महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्त्रीशिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या मिस् सिंथिया फॅरार यांच्या कार्याशी जोडलेले आहेत, त्या शाळेचे महत्त्व केवळ विद्यार्थीसंख्येच्या आकड्यांमध्ये मोजता येणार नाही. अहिल्यानगरमधील ऐतिहासिक क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूलच्या भवितव्याचा प्रश्न आज याच सामाजिक आणि ऐतिहासिक जाणीवेपुढे उभा ठाकला आहे.
शाळेतील विद्यार्थिनींची संख्या घटल्यामुळे शिक्षकांची मंजूर पदे शून्य (NIL) ठरविण्याचा निर्णय आणि त्याविरोधात दाखल झालेल्या याचिकांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने शाळेच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त होत आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ शाळा बंद झाली असा नसला, तरी शिक्षकांची पदे शून्य होणे आणि शाळेचे अभिलेख व साहित्य अन्य शाळेत जमा करण्याचे निर्देश कायम राहणे, या बाबी निश्चितच गंभीर आहेत.

मात्र, या परिस्थितीकडे केवळ प्रशासकीय किंवा संचमान्यतेचा प्रश्न म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण वारसा जतन करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे शासनाने या शाळेला विशेष बाब म्हणून ‘आदर्श मॉडेल स्कूल’चा दर्जा देऊन तिचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी पुढे येत आहे.
सिंथिया फॅरार यांच्या कार्यातून रुजले स्त्रीशिक्षणाचे बीज !
एकोणिसाव्या शतकात मुलींच्या शिक्षणाला समाजात अनेक बंधने होती. अशा प्रतिकूल वातावरणात अमेरिकन मराठी मिशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू झाले. या कार्यात मिस् सिंथिया फॅरार यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते.
२० एप्रिल १७९५ ते २५ जानेवारी १८६२ असा त्यांचा जीवनप्रवास. १८२७ मध्ये भारतात आल्यानंतर त्यांनी मुंबई आणि अहमदनगर परिसरात मुलींच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले. मुलींना शाळेत आणणे, पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणे आणि स्त्रीशिक्षणाला सामाजिक मान्यता मिळवून देणे, अशा विविध पातळ्यांवर त्यांनी काम केले.

अमेरिकन मराठी मिशनच्या १८४५ आणि १८४६ च्या वार्षिक अहवालांमध्ये अहमदनगरमधील त्यांच्या देखरेखीखाली मुलींच्या चार शाळा सुरू असल्याचे आणि त्यामध्ये शंभराहून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत असल्याचे संदर्भ आढळतात.
अहमदनगरमधील अमेरिकन मिशन गर्ल्स हायस्कूलच्या १८३८ ते १९३८ या शंभर वर्षांच्या इतिहासावर आधारित ‘100 Years 1838–1938: American Mission Girls’ High School, Ahmednagar, India’ हा ग्रंथही या ऐतिहासिक प्रवासाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या ग्रंथाच्या लेखिकांमध्ये क्लेरा एच. ब्रुस यांचा समावेश आहे.

सावित्रीबाईंच्या शिक्षक प्रशिक्षणाशी अहमदनगरचा ऐतिहासिक दुवा !
या शाळेच्या ऐतिहासिक महत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षक प्रशिक्षण.
इतिहास संशोधक कै. डॉ. हरी नरके यांनी २००८ मध्ये एनसीईआरटीसाठी प्रकाशित केलेल्या ‘Savitribai Phule: First Memorial Lecture’ या व्याख्यानात सावित्रीबाईंनी अहमदनगर येथील मिस् फॅरार यांच्या संस्थेत आणि पुण्यातील मिस् मिशेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षण घेतल्याची नोंद केली आहे. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातही या संशोधनाचा संदर्भ देण्यात आला आहे.
महात्मा जोतिराव फुले यांनी १८५३ मधील आपल्या निवेदनात अहमदनगरमधील अमेरिकन मिशनच्या मिस् फॅरार यांच्या मुलींच्या शाळांना भेट दिल्याचा उल्लेख केला आहे. तेथील मुलींचे शिक्षण आणि अध्यापन पद्धती पाहून समाधान वाटल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

म्हणजेच अहमदनगरमधील स्त्रीशिक्षणाचे कार्य हे महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासाशी जोडलेले आहे. या पार्श्वभूमीवर क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूलचे जतन करणे म्हणजे केवळ एका शैक्षणिक संस्थेचे संरक्षण नव्हे, तर स्त्रीशिक्षणाच्या चळवळीतील ऐतिहासिक दुव्यांचे जतन करणे होय.
३३ विद्यार्थिनींची संख्या ; शिक्षकांची मंजूर पदे शून्य !
Marathi Mission, Ahilyanagar या संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल आणि अहमदनगर बॉईज हायस्कूल या दोन शाळांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठाने २३ सप्टेंबर २०२६ रोजी WP 5880/2026 आणि WP 5903/2026 या याचिका फेटाळल्या.
न्यायालयासमोर सादर झालेल्या २०२५-२६ च्या आकडेवारीनुसार क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूलमध्ये एकूण ३३ विद्यार्थिनी शिक्षण घेत होत्या. त्यामध्ये पाचवीत ६, सहावी ते आठवी या वर्गसमूहात ११, तर नववी ते दहावी या वर्गसमूहात १६ विद्यार्थिनी होत्या. मुलांच्या शाळेतील विद्यार्थिसंख्याही ३३ होती.
![]()
१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयातील संचमान्यता निकषांनुसार विद्यार्थिसंख्येच्या आधारे दोन्ही शाळांमधील शिक्षकांची मंजूर पदे शून्य करण्यात आली होती. परिणामी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त घोषित करून अन्य शाळांमध्ये समायोजित करण्याचे आदेश देण्यात आले. शाळेचे अभिलेख आणि साहित्य माळीवाडा येथील श्रीकांत प्रेमराज गुगले हायस्कूलमध्ये जमा करण्याबाबतही निर्देश देण्यात आले होते.
संस्थेवर ४ नोव्हेंबर २०१० पासून प्रशासक नियुक्त असल्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या अंतर्गत प्रशासन आणि कर्मचारीविषयक निर्णयांना आव्हान देण्याच्या याचिकाकर्त्यांच्या अधिकाराबाबत न्यायालयाने निरीक्षण नोंदविले. तसेच शिक्षकांची मंजूर पदे शून्य ठेवण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
या निर्णयामुळे शाळा बंद झालेली नाही. मात्र, शिक्षकांची उपलब्धता, विद्यार्थिनींचे शैक्षणिक भवितव्य आणि ऐतिहासिक अभिलेखांचे संरक्षण या प्रश्नांवर आता शासन व प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.

माजी विद्यार्थिनींचे ऋण फेडण्याची वेळ !
या शाळेच्या वर्गखोल्यांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक विद्यार्थिनी आज समाजाच्या विविध क्षेत्रांत योगदान देत असतील. डॉक्टर, वकील, शिक्षिका, प्रशासकीय अधिकारी, उद्योजिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि गृहिणी म्हणून त्यांनी आपापल्या क्षेत्रात स्थान निर्माण केले असेल.
आज त्यांच्या शाळेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना त्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
माजी विद्यार्थिनींनी पुढाकार घेऊन ‘क्लेरा ब्रुस स्कूल बचाव संघटना’ स्थापन करावी. शाळेच्या ऐतिहासिक वाटचालीचे दस्तऐवजीकरण करावे. जुन्या विद्यार्थिनींच्या आठवणी, छायाचित्रे, शाळेचे वार्षिक अहवाल, ऐतिहासिक कागदपत्रे आणि संस्थेच्या नोंदी संकलित कराव्यात.
शाळेतील विद्यार्थिनींची संख्या वाढविण्यासाठी प्रवेश जनजागृती मोहीम राबवावी. आर्थिकदृष्ट्या गरजू मुलींसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य आणि अन्य मदतीचे उपक्रम सुरू करावेत. शाळेच्या पुनरुज्जीवनासाठी आर्थिक आणि बौद्धिक योगदान देण्याची चळवळ उभी करावी.

शासनाने ‘खास बाब’ म्हणून आदर्श मॉडेल स्कूल विकसित करावी !
महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी स्मरणवर्षाच्या पार्श्वभूमीवर या शाळेच्या प्रश्नाकडे शासनाने विशेष संवेदनशीलतेने पाहण्याची अपेक्षा आहे. कमी विद्यार्थीसंख्येच्या निकषांपलीकडे जाऊन या संस्थेचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व विचारात घ्यावे.
शाळेला ‘खास बाब’ म्हणून ऐतिहासिक शैक्षणिक वारसा असलेली आदर्श मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने विशेष धोरणात्मक निर्णय घ्यावा.
यासाठी पुढील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील :
१. शाळेचे अस्तित्व कायम ठेवावे : क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूलचे शैक्षणिक कार्य खंडित होऊ नये, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.
२. शिक्षकांची व्यवस्था करावी : विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून लागू नियमांच्या चौकटीत आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्याचे पर्याय तपासावेत.
३. ऐतिहासिक वास्तू आणि दस्तऐवज जतन करावेत : शाळेची इमारत, जुनी छायाचित्रे, वार्षिक अहवाल, अभिलेख आणि अन्य ऐतिहासिक साहित्य सुरक्षित ठेवावे.
४. माजी विद्यार्थिनींचा सहभाग घ्यावा : माजी विद्यार्थिनी, शिक्षणतज्ज्ञ, इतिहास संशोधक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची सल्लागार समिती स्थापन करावी.
५. विद्यार्थिनींची संख्या वाढवावी : परिसरात जनजागृती करून मुलींना शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. गरजू विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात.
६. इतिहासाचे कायमस्वरूपी दालन उभारावे : सिंथिया फॅरार, क्लेरा ब्रुस, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाची माहिती देणारे ऐतिहासिक दालन शाळेत विकसित करावे.
७. विशेष समिती नेमावी : जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, इतिहास संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि माजी विद्यार्थिनींच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती नेमून कालबद्ध कृती आराखडा तयार करावा.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा!
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या ऐतिहासिक शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शाळेतील विद्यार्थिनींची संख्या, शिक्षकांची उपलब्धता, इमारतीची स्थिती, संस्थेचे व्यवस्थापन आणि ऐतिहासिक अभिलेखांची सद्यस्थिती यांचा सविस्तर आढावा घ्यावा.
त्यानंतर शाळेचे ऐतिहासिक महत्त्व आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षक प्रशिक्षणाशी संबंधित संदर्भ लक्षात घेऊन राज्य शासनाकडे विशेष प्रस्ताव पाठवावा. शिक्षण विभाग, पुरातत्त्व व इतिहास संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून शाळेच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करावा.
शाळा वाचविणे म्हणजे इतिहास आणि भविष्य दोन्ही जपणे !
आज विद्यार्थीसंख्या कमी आहे म्हणून उद्या ही शाळा इतिहासजमा होऊ द्यायची का, हा प्रश्न अहिल्यानगरकरांनी स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. ज्या काळात मुलींना शिक्षण देणे हेच मोठे सामाजिक आव्हान होते, त्या काळात स्त्रीशिक्षणाचा पाया घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याशी या शाळेचा ऐतिहासिक संबंध आहे.

आजच्या पिढीने त्या वारशाचे महत्त्व ओळखून त्याला नवसंजीवनी देणे गरजेचे आहे. शासनाने नियमांच्या चौकटीत विशेष शैक्षणिक पर्याय तपासावेत, माजी विद्यार्थिनींनी संघटित व्हावे आणि अहिल्यानगरमधील नागरिकांनी या उपक्रमाला सामाजिक पाठबळ द्यावे.
माजी विद्यार्थिनींनो, ज्या शाळेने तुम्हाला घडविले, तिच्यासाठी आता पुढे येण्याची वेळ आहे!
अहिल्यानगरकरांनो, आपल्या शहराच्या ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी एकत्र या !
शिक्षणप्रेमींनो, इतिहास संशोधकांनो, सामाजिक संस्थांनो, या शाळेच्या पुनरुज्जीवनासाठी योगदान द्या !
सिंथिया फॅरार यांच्या कार्याचा सन्मान, सावित्रीबाईंच्या शैक्षणिक प्रवासाची ऐतिहासिक आठवण आणि मुलींच्या शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूलचे अस्तित्व टिकणे महत्त्वाचे आहे.
शाळावाचली पाहिजे, इतिहास जपला गेला पाहिजे आणि स्त्रीशिक्षणाची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे !

