नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प !

रस्त्यावरील संघर्षानंतरही जुन्या सरळ मार्गाला महायुती सरकारचा ठेंगा ; सरकारने जनतेला गंडवल्याची भावना !

विशेष प्रतिनिधी –

नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा मूळ आराखड्यानुसार सरळ मार्गाने म्हणजेच सिन्नर संगमनेर, नारायणगाव, खेड, मंचर मार्गेच व्हावा, या मागणीसाठी पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेने व सर्वपक्षीय नेत्यांनी उठवलेला आवाजाचा महायुती सरकारने अक्षरशः कचरा केल्याचे उघडकीस आले आहे. सत्ताधाऱ्यांनी केवळ आश्वासनांची खैरात करत आणि समितीचा खेळ मांडत लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसली असून, या सर्व आंदोलकांना गंडवल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

९ ऑगस्टचा ‘स्टंट’ अन् सरकारची बनवाबनवी

गेल्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून या रेल्वे मार्गासाठी रस्त्यावर उतरून भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सोशल मीडियावरून रिल्स, फोटो आणि व्हिडिओंचा भडीमार करत या आंदोलनाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. परंतु, प्रसिद्धीच्या या उद्योगामागे रेल्वे मूळ मार्गाने नेण्याचा ठोस निर्णय मात्र सरकारकडून पदरात पाडून घेता आला नाही, हेच अंतिम सत्य ठरले आहे.

आमदार सत्यजित पुन्हा तांबे आक्रमक ; पुन्हा संघर्षाचा इशारा

या संपूर्ण प्रकरणात महायुती सरकारचा दुटप्पीपणा उघडा पाडत आमदार सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावर संतप्त पोस्ट केली आहे. “आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानंतर सरकारने आश्वासनाचे गाजर दाखवत समिती स्थापन केली. मात्र, या समितीची मुदत संपून गेली तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे. सरकारच्या या चालढकल धोरणामुळे संतप्त झालेल्या तांबे यांनी आता पुन्हा एकदा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

रेल्वे पळवण्यामागे ‘त्या’ अदृश्य शक्ती कोणत्या ?

पूर्वी ठरलेल्या मूळ आराखड्यानुसार ही रेल्वे संगमनेर मार्गे अत्यंत सरळ आणि कमी अंतराची होणार होती. मात्र, अचानक हा मार्ग वळवून शिर्डीमार्गे नेण्याचा घाट का घातला गेला ? हा प्रकल्प पळवून नेण्यामागे नेमके कोणते नेते किंवा अदृश्य शक्ती कार्यरत आहेत, याबाबत संपूर्ण अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात संशयाचे ढग दाटले आहेत. काही मातब्बर नेत्यांच्या समर्थक आमदारांनी या आंदोलनापासून पूर्णपणे काढता पाय घेतल्याने आणि कोणतीही ठोस कृती न केल्याने त्यांच्यावरही आता संशयाची सुई वळली आहे. या रेल्वे मार्गाच्या कामात कुणीतरी खुट्या ठोकल्या असा आरोप माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील केला आहे.

आमदार अमोल खताळ पाटलांची ‘आमदारकी पणाला’ फक्त कागदावरच !

“पुणे-नाशिक रेल्वे मूळ ठरलेल्या संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे, यासाठी मी माझी आमदारकी पणाला लावेन,” अशी घोषणा संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी जनतेला दिली होती. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ आली तेव्हा त्यांनी ना आमदारकी पणाला लावली, ना रेल्वे संगमनेर मार्गे आणण्यासाठी कोणतीही ठोस कृती केली. त्यामुळे खताळ पाटील यांची नेमकी भूमिका काय, ते जनतेसोबत आहेत की नाहीत असा उद्विग्न सवाल आता नागरिक विचारत आहेत.

पालकमंत्री विखे पाटलांच्या दिल्ली वाऱ्यांचा ‘फुसका बार’

अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्ली गाठत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली, तर मुंबईत मुख्यमंत्र्यांशी विशेष चर्चा करून काही गोपनीय कागदपत्रे सादर केल्याच्या बातम्या मीडियामध्ये जोरदार व्हायरल झाल्या होत्या. परंतु, या हाय-प्रोफाईल बैठकांचा निकाल काय लागला ? शेवटी ‘रेल्वे संगमनेरला आलीच नाही’ हाच एकमेव निष्कर्ष समोर आला. यावरून पालकमंत्र्यांचे ते दौरे केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी आखलेला एक राजकीय देखावाच होता असे आता जनतेतून बोलले जात आहे. 

एकंदरीत, आधीच तुटपुंज्या पायाभूत सुविधांमुळे त्रस्त असलेल्या खेड, मंचर, नारायणगाव, संगमनेर आणि सिन्नर भागातील जनतेच्या आशा-आकांक्षांवर महायुती सरकारने पाणी फेरले आहे. 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!