सहकाराचा बुरखा अन् स्वार्थाचा विळखा :
आटपाट नगरीतील राजकीय ‘सर्कस’ आणि रयतेची होणारी फसवणूक !

आटपाट नगरीच्या राजकारणात सध्या एका नव्या आणि किळसवाण्या नाट्याचा प्रयोग सुरू आहे. एरवी व्यासपीठावरून एकमेकांची उणीदुणी काढणारे, एकमेकांचे कपडे वेशीवर टांगणारे आणि जनतेसमोर आपणच कसे एकमेकांचे ‘कट्टर विरोधक’ आहोत असा आव आणणारे राजकीय नेते आज गळ्यात गळे घालून फिरताना दिसत आहेत. कारण एकच—जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारी ती मुख्य ‘आर्थिक संस्था’ !
ही दुभती गाय आपल्याच दावणीला बांधलेली असावी आणि सहकाराच्या नावाखाली सुरू असलेली स्वतःची राजकीय, सामाजिक व आर्थिक दुकानदारी अबाधित राहावी, यासाठी सर्व पक्षाचे आजी-माजी मंत्री, (पडलेले, निवडून आलेले) खासदार अन् आमदारांनी आपले सर्व मतभेद गुंडाळून एकत्र येण्याचा ‘पराक्रम’ केला आहे.
राजकीय निवडणुका आल्या की, जनतेला भावनिक साद घालायची, एकमेकांवर तोंडसुख घ्यायचे आणि मतदारांची दिशाभूल करायची, हा यांचा नेहमीचाच धंदा. निवडणुका संपल्या की सत्तेची साय वाटून घ्यायची, लाल दिव्याच्या गाड्या पचवायच्या आणि त्यातून अथांग पैसा कमवून स्वतःच्या इस्टेट अन् जमिनी वाढवायच्या ! पण जेव्हा जेव्हा यांच्या या ‘टोळी’च्या आर्थिक हितसंबंधांना धक्का बसू लागतो किंवा सहकारात एखादा नवा, प्रामाणिक चेहरा वर येऊन आपल्या उरावर बसेल अशी भीती वाटू लागते, तेव्हा मात्र ही थोर (आणि चोर) मंडळी अचानक ‘सहकार समृद्ध’ करण्याचे उदात्त तत्त्वज्ञान सांगू लागतात. सहकाराच्या नावाखाली स्वार्थाची चूल पेटवणारे हे नेते एकत्र येऊन रयतेच्या डोळ्यात सहज धूळफेक करतात.
काही दिवसांपूर्वीपर्यंत एकमेकांचे तोंडही पाहायला तयार नसणारे हे सोयीचे राजकारणी आज अत्यंत गुळगुळीतपणे एकत्रित येऊन संयुक्त पत्रके काढत आहेत. ही राजकीय लाचारी आणि स्वतःची घरे भरण्याची हाव पाहून आज आटपाट नगरीच्या सामान्य रयतेला या सर्व प्रकाराचा प्रचंड उबग आला आहे.
पण आता प्रश्न असा उपस्थित होतो: आटपाट नगरीची सूज्ञ रयत या ‘सोयीच्या राजकारणाला’ आणि सहकाराच्या नावाखाली चाललेल्या या दरोडेखोरीला ओळखून यांना योग्य ती जागा दाखवणार, की पुन्हा एकदा या भामट्या नेत्यांच्या गोड बातांना बळी पडून यांनाच डोक्यावर घेऊन नाचणार? हे येणारा काळच ठरवेल. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे—सहकाराचा बुरखा ओढून स्वतःची दुकानदारी चालवणाऱ्या या नेत्यांचे खरे चेहरे आता उघडे पडले आहेत!
