सह्याद्री वाचवायचा असेल तर आधी समाजाची मानसिकता जागी करावी लागेल
पश्चिम घाट बचावासाठी अकोलेत संयुक्त ग्रामसभा; आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर
अकोले : प्रतिनिधी
सह्याद्रीचे संरक्षण हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून आदिवासी समाजाच्या अस्तित्वाशी आणि भावी पिढ्यांच्या भवितव्याशी निगडित प्रश्न आहे. त्यामुळे सह्याद्री वाचवायचा असेल, तर सर्वप्रथम समाजाची मानसिकता जागी करण्याची गरज आहे, असा सूर २५ सप्टेंबर रोजी अकोले येथे झालेल्या संयुक्त ग्रामसभेत उमटला.
पश्चिम घाट बचाव कृती समिती, बिरसा ब्रिगेड व संयोगी संघटनांच्या वतीने अकोले तालुक्यातील पेसा ग्रामपंचायतींसह ठाणे, नगर, पुणे व नाशिक जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतींची संयुक्त ग्रामसभा पंकज लॉन्स येथे घेण्यात आली. या ग्रामसभेला सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील बलराज मलिक तसेच बिरसा ब्रिगेडचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सतिषदादा पेंदाम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
बलराज मलिक यांनी सह्याद्री, आदिवासी समाज आणि सामाजिक प्रश्नांकडे व्यापक व दूरदृष्टीने पाहण्याची गरज मांडली. तर सतिषदादा पेंदाम यांनी आदिवासी समाजासमोरील संकटे, सामाजिक मानसिकता आणि भविष्यातील आव्हाने याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

“हे आंदोलन का आणि कशासाठी लढायचे आहे?” हा प्रश्न त्यांनी उपस्थित सरपंचांसमोर ठेवला. त्याचे उत्तर केवळ ‘सह्याद्री वाचवणे’ एवढे मर्यादित नसून, आपले जल, जंगल, जमीन, गाव आणि पुढील पिढीचे अस्तित्व वाचवणे, असा व्यापक अर्थ या आंदोलनामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामसभेतील उपस्थितीचा संदर्भ देताना समाजाच्या जागृतीबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. सह्याद्रीच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले असताना, जल-जंगल-जमिनीच्या प्रश्नांवर निर्णायक चर्चा करण्याची वेळ आली असताना समाजातील मोठा वर्ग इतर उत्सव आणि मनोरंजनात व्यस्त राहतो, ही बाब चिंतेची असल्याचे मत मांडण्यात आले.
“आपल्या अस्तित्वाचा प्रश्न मोठा की क्षणिक आनंद?” असा सवाल उपस्थित करत भावी पिढीने “आमच्यासाठी तुम्ही काय केले?” असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर आजपासूनच्या कृतीतूनच द्यावे लागेल, असे आवाहन करण्यात आले.

संघटनांच्या पलीकडे जाऊन एकत्र येण्याचे आवाहन
अकोले तालुक्यात आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी विविध संघटना, अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत आहेत. मात्र अशा महत्त्वाच्या ग्रामसभेला त्यांची उपस्थिती अपेक्षेप्रमाणे नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. हा प्रश्न कोणत्याही एका संघटनेवर टीका करण्यासाठी नसून, प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
“आज बिरसा ब्रिगेड असेल, उद्या दुसरी संघटना असेल; मात्र सह्याद्री आणि आदिवासी समाजाचे अस्तित्व सर्वांचे आहे. त्यामुळे संघटनांच्या सीमा आणि मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची ही वेळ आहे,” असा संदेश देण्यात आला.
भाषणांपेक्षा कृती महत्त्वाची
सह्याद्री हा केवळ डोंगर नसून तो पूर्वजांचा इतिहास, संस्कृतीचा आधार, जलस्रोतांचा रक्षक आणि गावांच्या अस्तित्वाची ढाल आहे. त्यामुळे केवळ सभा, भाषणे आणि चर्चा करून प्रश्न सुटणार नाहीत; त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे, असे आवाहन करण्यात आले.

“गर्दी कमी असेल तरी चालेल; मात्र दर्दी कमी होता कामा नये,” असा संदेश देत प्रत्येकाने स्वतःला काही मूलभूत प्रश्न विचारण्याचे आवाहन करण्यात आले—मी काय केले? माझ्या गावासाठी काय केले? आणि भावी पिढीसाठी काय करणार?
सह्याद्रीचे अस्तित्व, आदिवासी समाजाचे हक्क, गावांचे भविष्य आणि पुढील पिढीचे भवितव्य यासाठी आता केवळ बोलण्याची नव्हे, तर जागृत होऊन एकत्रितपणे कृती करण्याची वेळ आली आहे, असा निर्धार या ग्रामसभेतून व्यक्त करण्यात आला.
“सह्याद्री धोक्यात होता, तेव्हा तुम्ही कुठे होता?” हा प्रश्न भविष्यातील पिढीने विचारण्यापूर्वीच आजच्या पिढीने जागे होण्याची गरज आहे. या सर्व माहितीपर लेखाचे शब्दांकन संजय साबळे, शिळवंडीकर यांनी समाज माध्यमातून केले आहे.
