संगमनेर शहरात शिस्तबद्ध गणेश विसर्जन ; पण पोलिसांच्या कारभारावर संशयाची सुई : डीजेच्या दणदणाटात संगमनेरात ‘ऑल वेल’, तर ग्रामीण पोलिसात गुन्हा !
संगमनेर (विशेष बातमीदार):
संगमनेर शहर आणि परिसरात यंदाचा गणेश विसर्जन सोहळा अत्यंत उत्साहात, डीजे आणि ढोल-ताशांच्या गुजरात पार पडला. शहरात विसर्जन मिरवणूक पूर्णपणे शिस्तबद्ध आणि ‘ऑल वेल’ पार पडल्याचा दावा संगमनेर शहर पोलिसांनी केला आहे. मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषण किंवा डेसिबलच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याप्रकरणी शहरात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, दुसरीकडे ग्रामीण हद्दीतील कोकणगाव येथे डीजे आणि वाद्याच्या आवाजाप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या दुटप्पी कार्यपद्धतीवर नागरिकांमधून संशय व्यक्त केला जात आहे.
शहरातील मानाचा पहिला सोमेश्वर मंडळाच्या श्रींची विधिवत पूजा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते पार पडली. यानंतर सोमेश्वर गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला. पाठोपाठ चौंडेश्वरी मंडळ, साळीवाडा मित्र मंडळ, चंद्रशेखर चौक मित्र मंडळ, नेहरू चौक मित्र मंडळ, माळीवाडा मित्र मंडळ आणि राजस्थान मित्र मंडळ यांसह विविध नामांकित मंडळांचे गणपती मिरवणुकीत सहभागी झाले.

डीजेच्या गाण्यांवर तरुणाईचा ठेका आणि ढोल-ताशांच्या गजराने संगमनेरचे रस्ते दुमदुमून गेले होते. संगमनेर शहर पोलिसांनी या मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त तैनात केला होता. प्रवरा पात्रात विसर्जन व स्वच्छता उपक्रम गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नगरपालिकेच्या वतीने प्रवरा नदीपात्रातील कासारवाडी, गंगामाई घाट, केशव तीर्थ तसेच प्रवरा-म्हाळुंगी संगम अशा विविध ठिकाणी सुरक्षित आणि चोख सोय करण्यात आली होती.
नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘एकविरा फाउंडेशन’ आणि इतर स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या वतीने निर्माल्य संकलनाचे काम अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आले. भाविकांनीही या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद देत निर्माल्य संकलन कलशात जमा केले. ग्रामीण भागातही गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले.
संगमनेर शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता, “विसर्जन मिरवणूक अतिशय शांततेत, नियमांचे पालन करून आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडली असून डीजे किंवा आवाजाच्या उल्लंघनाबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही,” अशी माहिती देण्यात आली.

मात्र, पोलिसांच्या या ‘ऑल वेल’च्या दाव्यावर आता शहरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे आणि वाद्ये वाजत असताना शहर पोलिसांना डेसिबलचे उल्लंघन दिसले नाही का ? संगमनेर तालुका पोलिसांनी ग्रामीण भागात डीजे आणि वाद्याच्या आवाजाप्रकरणी गुन्हा दाखल केला. एकाच तालुक्यात शहर पोलीस आणि तालुका पोलीस यांच्या कारवाईत तफावत का ? शहरात नियमांना पायदळी तुडवणाऱ्यांवर मेहेरबानी आणि ग्रामीण भागात मात्र कायद्याचा बडगा, अशी दुटप्पी भूमिका पोलीस प्रशासन का घेत आहे ? अशी चर्चा आता रंगली आहे. प्रचंड राजकीय दबावात असल्यामुळे पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्थेची बूज राखली जात नाही असे आता बोलले जात आहे. शहरातील ‘कायदेशीर’ मिरवणुकीचा दावा पोलिसांच्या संशयास्पद कार्यपद्धतीमुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
