स्वीडिश खासदार नीला विखे पाटील यांचा दावा ; ‘काका राधाकृष्ण व चुलत भाऊ सुजय यांच्याशी दशकभर संपर्क नाही’
माझ्या राजकीय यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आश्चर्यकारक असल्याचे नीला यांचे वक्तव्य
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
महाराष्ट्रातील विखे पाटील कुटुंबाशी संबंध असलेल्या आणि नुकत्याच स्वीडनच्या संसदेत निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांनी आपल्या राजकीय यशाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्याशी गेल्या दशकभरापासून आपला कोणताही संपर्क नसल्याचे नीला यांनी म्हटले आहे.
पीटीआयशी बोलताना नीला यांनी सांगितले की, सुजय विखे पाटील यांचा एक व्हिडिओ कोणीतरी आपल्याला पाठवला. त्यामध्ये महाराष्ट्रात विखे पाटील कुटुंबातील एका उमेदवाराचा पराभव झाला असला तरी कुटुंबातील दुसरा सदस्य स्वीडनमध्ये संसदेत निवडून आल्याचा संदर्भ असल्याचे त्यांनी सांगितले.

“गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ माझा काका किंवा चुलत भावाशी कोणताही संपर्क नाही. मी नियमितपणे भारतात येत असते. त्यामुळे आता माझ्या निवडणुकीतील यशाशी त्यांचा संबंध जोडला जात असल्याचे पाहून आश्चर्य वाटले,” असे नीला यांनी म्हटले आहे.
नीला यांनी आपली आणि महाराष्ट्रातील विखे पाटील कुटुंबाची राजकीय भूमिका वेगळी असल्याचेही स्पष्ट केले. आपण स्वीडनमधील ग्रीन पार्टीशी बांधील असून पक्ष बदलणार नसल्याचे त्यांनी सांगितले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेत काम केले असून २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
नीला विखे पाटील या शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. त्या माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत.

१३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या स्वीडनच्या राष्ट्रीय निवडणुकीत नीला यांची स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून ३४९ सदस्यांच्या रिक्सदागमध्ये निवड झाली. स्वीडिश संसदेच्या अधिकृत नोंदीनुसार त्या ग्रीन पार्टीच्या सदस्य असून त्यांचा संसदीय कार्यकाळ २८ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होत आहे.
दरम्यान, नीला यांच्या निवडीबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अभिनंदन केले होते. त्यांच्या निवडीला संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले होते. नीला यांनीही निवडीनंतर काकांनी फोन करून अभिनंदन केल्याचे सांगितले; मात्र त्यापलीकडे आपला नियमित संपर्क नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
