मिस्टर गांधी उत्तर द्या.. 

गांधी, खरं म्हणजे बापू म्हणायला हवं होतं, किंवा महात्मा पण, तरी मी मुद्दाम गांधी म्हणतोय आणि तुम्हाला प्रश्न विचारतोय. 

तुमच्याबद्दल रोज इतकं बोललं जातंय, हे तुम्हांला माहीत आहे का? म्हणजे चांगलं, वाईट असं दोन्हीही बाजूने बोललं जातंय … यातलं खरं काय आहे हो गांधी?

पण, मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस कसा वाईट होता, त्याने देशाचे किती नुकसान केलं आहे, तो अगदी देशद्रोही होता असं बोलणाऱ्यांची संख्या आताही कमी नाही. गंमत म्हणजे यातल्या बहुतेकांनी तुम्ही लिहिलेली एकही ओळ वाचलेली नाही. तुम्ही देशद्रोही आहात का गांधी?

तुमचं चरित्र वाईट होत असं म्हणणा-यांनी तुमचं एकही चरित्र वाचलेलं नाही. 

दूसरीकडे तुमच्या काही भक्तांनी तुम्हाला पोथीत बंद केले आहे. तुम्ही परिवर्तन स्वीकारणारे म्हणून प्रसिद्ध. पण, तुमच्याच भक्तांनी तुम्हांला अपरिवर्तनीय करुन टाकलं आहे. भक्त आणखी काय करतात. तुम्ही नेमके कसे होतात गांधी?

तुमचं नाव अजूनही चलनी नाणं आहे हे तुम्हांला माहीत आहे का गांधी? फक्त राजकारणातच नाही तर व्यवहारातसुद्धा आम्ही चलनाला गांधी हा पर्यायी शब्द वापरतो. म्हणून तुम्हाला सतत खिशात ठेवतो आम्ही… हे नेमके काय आहे?

‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’, हे लहानपणापासून ऐकतो आहे, ह्याचा नेमका अर्थ काय आहे हो गांधी? तुम्ही तरी सांगा.

तुमची किती चेष्टा केली जाते हे तुम्हाला माहीत नसेल… किती-किती नावाने तुम्हांला संबोधित केलं जातं हे तुम्हांला माहितही नसेल… तुम्ही चेष्टा आणि कुचेष्टाचा विषय आहातच पण, अनेकांच्या द्वेषाचा देखील विषय आहात.

तुम्ही काय काय चुका आणि पाप केली ते तुम्हीच लिहून ठेवलं आहे. पण, गांधी तुम्हांला माहीत नसलेली अनेक पापं तुमच्या माथ्यावर आम्ही मारून ठेवली आहेत…. तुम्हांला ही पापं माहीत आहेत का?

तुम्ही सतत राम नाम जपायचे, अभंग आणि प्रार्थना म्हणायचे म्हणून इथल्या मुस्लिमांनी तुमच्याकड़े सतत संशयाने पाहिलं. पण, म्हणून हिंदू तुम्हांला आपलं मानतात ह्या भ्रमात राहु नका… तुम्ही नेमके कोणाचे होतात हा संशय अजूनही दोघांना आहे… म्हणजे तुम्ही माणूस होतात आणि माणुसकीवर प्रेम करत होतात ह्या वर दोघांचा विश्वास नाही. मग तुम्ही नेमके कोणत्या धर्माचे आहात गांधी?

आइनस्टाइन म्हणाला ते खरं वाटतं की, ‘तुम्ही हाडामासाचे माणूस होतात ह्यावर येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत!’ त्याचं हे भाकित आम्ही खरं ठरवलं आहे… तुम्ही नेमके कोण होतात हे सांगा गांधी?

तुम्हाला मारणाऱ्या त्या थोर अमानवाचे पुतळे उभारले तर तुम्हांला नवल वाटायला नको… ही तुम्हांला सूचना आहे. धमकी समजा हवंतर.. तुमच्या सत्याग्रह किंवा उपोषण असल्या फालतू गोष्टींना आता काही किंमत नाही, हे तुम्हांला माहीत आहे ना?

मला कळत नाही की, गांधी तुमचा खून केला, तरी तुम्ही संपायला तयार नाही. आम्ही तुम्हांला खुप बदनाम केलं तरी तुम्ही त्याला पुरुन उरलात… आम्ही देशातच तुम्हांला खुप बदनाम केलं पण, तरी सगळं जग तुमच्या समोर कस नतमस्तक होत हो?

जगात कोणीही असो, भारत म्हणजे गांधीचा देश असं कसं म्हणतात हो? 

गांधी तुमचा विचार मान्य नसलेली माणसं देखील तुमच्या समोर कशी झुकतात हो?

इतके सगळे शोध लागून, प्रगती होऊन, प्रचंड विकास होऊनदेखील शेवटी सगळे विद्वान तुमच्या जुनाट विचारांजवळ येऊन का थांबतात? 

जगाला तुमचाच विचार वाचवेल अस सतत जगाला का वाटतं? 

तुमच्याशी वैचारिक मतभेद असणारी विचारधारा तुमच्या पुढे नतमस्तक का होते? 

डावे म्हणतात की, तुम्हांला काही कळत नाही तुम्ही गोंधळलेले होतात? 

उजवे म्हणतात की, तुम्हांला इतर धर्माविषयी प्रेम होत ? 

यातल खरं काय?

तुम्ही नेहमी सत्य बोलायचे असं म्हणतात ते खरं आहे का हो? कारण दिवसभरात आम्ही इतके असत्य बोलतो की, कुणी नेहमी खरं बोलतं हेच आता खोटं वाटतं!

मला खरच कळत नाही गांधी, मी कोणावर विश्वास ठेवू … या सोशल मीडियाच्या जगात तर तुम्ही अफाट बदनाम आहात …कितीतरी माणसं तुमच्यावर इतकी तूटुन पडतात की, वर्षानुवर्ष तुम्ही त्यांच्यावर केलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी रणशिंग फुंकलं आहे अस वाटतं… सोशल मीडिया म्हणजे काय, हे तुम्हांला माहीत आहे का गांधी?

मी अतिशय सामान्य आहे. नीती नैतिकता या मार्गावरुन मला चालता येत नाही. भ्रष्टमार्ग स्वीकारल्याशिवाय मला उदरनिर्वाह करता येत नाही. पण, मग तरी मी तुम्हांला जाब विचारतो आहे. बोला, उत्तर द्या, बोला मिस्टर गांधी!

असं प्रेमाने आणि करुणेने नका बघू माझ्याकडे, मला नाही सहन होत ते… इतके क्षमाशील असणं बर नाही गांधी…

द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडणा-यांची आज पूजा केली जातेय. आणि तुम्हांला फाळणीचा गुन्हेगार ठरवलं जातंय गांधी… न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा हा देश तुम्हाला देताना, तुम्हाला यातना नाही का होत मिस्टर गांधी?

इतकं सगळं सहन करूनही तुम्ही सतत इतके हसतमुख असता, हे सगळं बघून तुम्हांला यातना नाहीत का होत? की काळाच्या ओघात तुम्ही सुद्धा बदललात?

कसे हसता हो तुम्ही ….

तुमची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला आदर्श मानणारे, आज सकाळीच, स्वत:ला साबरमतीचे आधुनिक संत म्हणवत तुमच्या पुतळ्याला हार घालून आले. हे तुम्ही पाहिलं असेलच.

मिस्टर गांधी तुम्ही कसे काय इतके सहनशील आहात हो? नथुरामाने तीन वेळा तुमच्यावर हल्ला केला. पण, तीनही वेळेला मोठ्या मनाने तुम्ही त्याला माफ केलंत. त्याच मारेकऱ्याने अखेरीस तुमचा जीव घेतला. तुम्ही अजून इतके सहनशील, सोशीक, क्षमाशील आहात का? 

कारण आतातर केवळ गोमांस घरी ठेवलं या संशयावरून ज्या घरातील एक मुलगा सैन्य दलात देशाची सेवा करतोय त्याच्या बापालाच ठेचून ठार मारलं जातंय. तुम्हांला वाटत नाही का? तुमची सोशिकता हा देश विसरला आहे, मिस्टर गांधी मला उत्तर द्या.

कि 75 वर्षात इथल्या मुर्दडांच्या प्रमाणे तुमच्याही संवेदना बोथट झाल्यात ..बोला मिस्टर गांधी..आज हे प्रश्न, तुम्हाला मनासारखे विचारणार आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, की तुम्हाला ठाऊक आहे करुणा आणि अंहिसा हेच शाश्वत सत्य आहे … बोला गांधी.  

मिस्टर गांधी उत्तर द्या…

तुम्हांला गोळ्या मारणा-याला तुम्ही खरच माफ केलंत का हो! भेटला का कधी तुम्हांला तो? तुम्हांला अहो जाहो करावंसं वाटत पण, त्याचं नावही तोंडात घ्यावसे वाटत नाही. कायद्याने ज्याला खुनाच्या आरोपाखाली फाशी दिली, त्या खुनाचे उदात्तीकरण करणारी नाटकं आता महाराष्ट्रात सुरु आहेत. हे नाटक बघायला समोर बसलेल्या प्रेक्षकवर्गावर अशी काही मोहिनी घातली जाते की, नाटकामध्ये एक क्षण असा येतो की, मारेकरी जेव्हा तुमच्यावर गोळ्या झाडतो तेव्हा संपूर्ण प्रेक्षकवर्ग उठून टाळ्या वाजवायला लागतो. होय मिस्टर गांधी हे तुमच्याच देशात घडतंय…   

तुम्हांला मारलेल्या बंदुकीतल्या गोळ्या अजूनही संपलेल्या नाहीत. विरोधी विचार ऐकूनच घ्यायचे नाही हे सूत्र आजही भारतात चालू आहे.काल-परवा पर्यंत तर या नामर्दांनी ज्यांच्या हातात पुस्तके आहेत अशांनाच गोळ्या मारल्या. 

आता इथे वृत्तपत्रामध्ये टिका केली की, त्या पत्रकारालाही जेलमध्ये घालण्याची व्यवस्था झालेली आहे. नवनव्या छद्मवादी लेबल्सच्या नावाखाली इथल्या बुद्धीवादी लोकांना कित्येक वर्षे जेलमध्ये ठेवले जातेय. त्यांना साधा जामीन देखील मिळत नाही. तुमच्या काळात इंग्रज तरी जामीन द्यायचे. पण, भारतीय संविधान अस्तित्वात असूनदेखील जामीनची व्यवस्था नाही. 

मिस्टर गांधी तुम्हांला गोळ्या घालताना जसे त्यांचे हात कापले नाहीत…. तसे आज कोणतेही कसलेही पाप करताना त्यांचे हात कापत नाहीत. किंबहुना हे पापच पुण्य आहे असे ते समजायला लागलेत. कारण, यांचे मेंदू थिजलेले आहेत. बंदुकीही त्याच आहेत आणि भेजाही तोच आहे.

मध्यंतरी एका संत संमेलनामध्ये, स्वत:ला बाबा म्हणवणारा छद्म बुवा तुम्हांला हरामी म्हणाला हे कळलं का हो तुम्हांला? आणि तुमच्या मारेकऱ्याने जे केलं ते ह्या देशाच्या भल्यासाठीच केलं असं बोलून तो मोकळा झाला. हे सर्व, हा देश उघड्या डोळ्याने बघतोय. बहुसंख्यांकांना हे पटत नाहीये. पण, दुर्देवाने हे बोलण्याची कोणी हिम्मतच दाखवत नाही. जस तुम्ही एकटे आणि काही जणांना घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरला आहात ब्रिटीशांना न घाबरता. तसे आता इथे लोक बोलायलाही घाबरत आहेत. तर विरोधात उतरायची बात लांबच राहिली.

भेजाही तोच आहे. पण, तरीही एक गोष्ट जी अविवादीत सत्य आहे. ती म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही गेलात आणि भारत हे नाव उच्चारलं की, हा तर गांधींचा देश अशीच ओळख भेटते! तुम्हांला अनेकवेळा मारुन सुद्धा ते तुम्हांला कधीच मारु शकणार नाहीत. 

जगाच्या पाठीवर कुणी कुठेही गेले तरी त्यांना गांधीजीच दिसतील, त्यांचा मारेकरी कुठेच दिसणार नाही. खरेतर तोही रुजून आहे, त्याच्या छळकपटवादी छद्म समर्थकांच्या मनात, त्यांना अजूनही तुम्हाला मारायचेय, पण काही केल्या तुम्ही मरतच नाहीत! नकळत त्यांनाही कळून चुकलेय की, हा देश गांधींचा आहे, त्यांच्याच नावाने ओळखला जातोय! 

सारा देश तुम्हाला मनापासून अभिवादन करत असताना, अनिच्छेने का होईना, पण बऱ्याच गर्विष्ठ माना तुमच्यापुढे झुकतात, तुमचा उद्घोष करतात, तुम्ही प्रातःस्मरणीय आहात असं वरवर म्हणतात! आपल्याच मनाचा कोंडमारा करतात. पण त्या सर्वांना तुम्ही कधीच क्षमा करुन तुम्ही पुढे निघून गेला आहात, जग आजही तुमच्या विचारांची प्रशंसा करते आणि तुमच्यापुढे नतमस्तक होते! मिस्टर गांधी, तुमच्या अमरत्वाचे रहस्य

तरी सांगा ! बोला, उत्तर द्या !

समीर गायकवाड यांच्या फेसबुक वॉल वरून..

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!