पहिले पोलिसांना बोलावले, नंतर पोलिसांविरुद्धच तक्रार ; डायल ११२ वर ‘पाच कॉल’चे नाट्य !
पोलिसांना दिवसभर ‘फिल्डवर्क’ ; संगमनेरात एकावर गुन्ह दाखल …
संगमनेर | प्रतिनिधी
दारूच्या नशेत डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच वेळा फोन करून पोलिसांची चांगलीच धावपळ उडविणाऱ्या धनंजय रामनाथ शिंदे (वय ३४, रा. देवगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक फोनमध्ये तक्रारीचा विषय बदलत गेला. कधी शेतीच्या जागेवर अतिक्रमण, कधी मारहाण, तर कधी चक्क जबरदस्तीने विष पाजत असल्याची तक्रार करण्यात आली. शेवटी पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली आणि या ‘कॉल मालिके’मागचे कारण समोर आले.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोकॉ/२४७१ उल्हास बापूराव बढे (वय ४९) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
सुरुवात शेतीच्या वादापासून…
५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पोकॉ उल्हास बापूराव बढे आणि पोकॉ गणेश थोरात हे डायल ११२ ड्युटीवर होते. दुपारी १.४३ वाजता धनंजय रामनाथ शिंदे याचा डायल ११२ वर फोन आला.
आपल्या जागेवर एका व्यक्तीने अतिक्रमण केले असून तो आपल्याला मारहाण करीत असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी फोनवर प्राथमिक चौकशी केली असता, “आमचे शेतीचे वाद चालू असून समोरचे लोक निघून गेले आहेत, तुम्ही येऊ नका,” असे त्याने सांगितले.

त्यामुळे पोलिसांनी हा कॉल कंट्रोलला कळवून बंद केला. पोलिसांना वाटले, प्रकरण संपले. मात्र, ही तर पुढच्या फोनची ‘ट्रेलर’ होती!
पुढचा कॉल : “जबरदस्तीने विष पाजत आहेत !”
दुपारी २.१० वाजता पुन्हा डायल ११२ वर फोन आला. यावेळी जबरदस्तीने विष पाजत असल्याची माहिती देण्यात आली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन उल्हास बापूराव बढे आणि गणेश थोरात हे शासकीय मोटारसायकलने घटनास्थळी रवाना झाले.
पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत २.३८ वाजता पुन्हा फोन आला. यावेळी कॉलरच्या भाऊ, बहीण, आई आणि चुलतीला जबरदस्तीने विष पाजत असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली. मात्र, पोलिस चौकशी करीत असतानाच धनंजय रामनाथ शिंदे याने पोलिसांशी बोलून थोडे बाजूला जाऊन पुन्हा २.४९ वाजता डायल ११२ वर फोन केला.

पोलिसांविरुद्धच तक्रार….
यानंतर दुपारी ३ वाजता पोकॉ संतोष बाचकर यांच्याकडे असलेल्या एमडीटीवरही कॉल करून “पोलिसांनी मला मारहाण केली आहे, मदत हवी आहे,” असा कॉल केला. काही वेळापूर्वी पोलिसांना मदतीसाठी बोलावणारा कॉलर आता पोलिसांविरुद्धच मदतीची हाक देत असल्याने या प्रकरणाने अक्षरशः ‘यू-टर्न’ घेतला!
चौकशीत ‘आंबट उग्र वास’; वैद्यकीय तपासणीत दारूचे सेवन स्पष्ट
पोलिसांनी धनंजय शिंदे याच्याकडे तक्रारीबाबत विचारपूस केली असता तो उलटसुलट उत्तरे देत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावेळी त्याच्या तोंडातून आंबट उग्र वास येत असल्याने पोलिसांनी त्याला संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आणले.
त्यानंतर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धनंजय रामनाथ शिंदे हा अमली पदार्थाचे अमलाखाली असल्याचा अभिप्राय दिला.
पाच कॉल, पाच तक्रारी आणि पोलिसांची धावपळ !
डायल ११२ वरील कॉलच्या अनुषंगाने पोलिसांनी धनंजय शिंदे याच्याकडे चौकशी केली असता, तो दारूच्या नशेत वारंवार विनाकारण डायल ११२ वर कॉल करीत असल्याचे समोर आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याने त्या दिवशी डायल ११२ वर एकूण पाच कॉल केले. या सर्व कॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या. पोलिस प्रशासनाला त्रास देण्याच्या उद्देशाने दारूच्या नशेत हे कॉल करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
एकंदरीत, आपत्कालीन क्रमांकावर मदतीसाठी फोन करण्याऐवजी एका व्यक्तीनेच पोलिसांना दिवसभर ‘फिल्डवर्क’ दिले आणि शेवटी वैद्यकीय तपासणीनंतर या सगळ्या फोननाट्याचा खुलासा झाला !
या प्रकरणी धनंजय रामनाथ शिंदे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम २१२ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ८५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
