मुलींच्या स्वसंरक्षणासाठी संगमनेर तालुक्यात ‘मुक्का’मार अभियान
संगमनेर प्रतिनिधी :
मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर मुलींमध्ये आत्मनिर्भरता आणि स्वसंरक्षणाचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यात ‘मुक्का’मार अभियान राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील २७ विद्यालयांमधील विद्यार्थिनींना वर्षभर स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती हिंदी चित्रपट अभिनेत्री तथा ‘मुक्का’मार फाउंडेशनच्या संस्थापक इशिता शर्मा यांनी दिली.
वडगाव पान येथील डि.के. मोरे जनता विद्यालयात एकविरा फाउंडेशन आणि ‘मुक्का’मार फाउंडेशन यांच्यात विद्यार्थिनींना वर्षभर प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, इशिता शर्मा, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, ट्रेनर अक्षिता करकेरा, श्रद्धा सोनार, ऋषभ चोप्रा यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला सुमारे १५०० विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी इशिता शर्मा म्हणाल्या की, देशात महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. मुलींनी आत्मनिर्भर होण्याबरोबरच स्वतःच्या संरक्षणासाठी सक्षम झाले पाहिजे. ‘मुक्का’मार फाउंडेशनच्या माध्यमातून मुलींना वर्षभर प्रशिक्षण देऊन त्यांना खेळाडू फायटर बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संगमनेर तालुक्यातील हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असे त्यांनी सांगितले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, मुलींनी चांगला आहार घेऊन शरीर तंदुरुस्त ठेवण्याबरोबरच स्वतःमध्ये धाडस निर्माण केले पाहिजे. कुणी त्रास देत असल्यास ते लपवून न ठेवता शाळा किंवा पोलिसांकडे तातडीने तक्रार करावी. चुकीच्या गोष्टींना संगमनेर तालुक्यात कधीही पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘मुक्का’मार अभियानांतर्गत २७ शाळांमधील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार असून मुलींनी निर्भीडपणे या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
दुर्गाताई तांबे यांनीही मुली व महिलांवरील वाढते अत्याचार ही चिंताजनक बाब असल्याचे सांगत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मुलींसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल, असे नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अॅसिड हल्ल्यातील आरोपी पाच महिन्यांनंतरही फरार ; डॉ. थोरात यांच्याकडून नाराजी
७ मार्च रोजी वडगाव पान येथील चिमुकलीवर अॅसिड हल्ला झाला होता. या घटनेला पाच महिने उलटून गेले तरी आरोपी पोलिसांना सापडलेला नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली तर अशा गुन्ह्यांना आळा बसेल. वडगाव पान येथील अॅसिड हल्ल्यातील आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी डॉ. जयश्री थोरात यांनी केली.
