दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले पाच सराईत आरोपी जेरबंद

आरोपींकडून गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस असा १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क 

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, दोन मोटारसायकली व तीन मोबाइल असा एकूण १ लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता अहिल्यानगर ते मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाटा परिसरात करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोल्हेगाव फाटा लगत असलेल्या आराध्या पेट्रोलियम भारत पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, हॉटेल बजरंगच्या बाजूला काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता प्रेम नरेंद्र भाकरे (वय २३, रा. नागापूर, ता. जि. अहिल्यानगर), यश सुनील घाग (वय २३, रा. पितळे कॉलनी, नागापूर, ता. जि. अहिल्यानगर), विशाल भाऊसाहेब पाटोळे (वय २४, रा. नागापूर, ता. जि. अहिल्यानगर), अभिषेक उर्फ भोऱ्या अरविंद भिंगारदिवे (रा. नागापूर, ता. जि. अहिल्यानगर) आणि संग्राम सोन्याबापू कदम (रा. नागापूर, ता. जि. अहिल्यानगर) हे पाच जण आढळून आले. यातील अभिषेक उर्फ भोंक्या अरविंद भिंगारदिवे व संग्राम सोन्याबापू कदम हे फरार आहेत. 

आरोपींकडे देशी बनावटीचा गावठी कट्टा, जिवंत काडतूस, लाल मिरची पूड आदी घातक साहित्य आढळून आले. आरोपी दरोडा घालण्याची पूर्वतयारी करीत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस अंमलदार पोकाॅ/१०२४ नवनाथ दहिफळे यांनी फिर्याद दिली. त्यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७९१/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१०(४), ३१०(५) तसेच आर्म्स ॲक्ट कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणाचा पुढील तपास सफौ राकेश सुभाष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. ही कारवाईत सपोनि हेमंत थोरात, प्रभारी अधिकारी, एमआयडीसी पोलीस स्टेशन, सफौ राकेश खेडकर, पोहेकॉ बापूसाहेब फोलाणे, पोहेकॉ शैलेश रोहोकले, पोहेकॉ राजू सुद्रीक, पोहेकॉ आजिनाथ पालवे, पोकाॅ दीपक फुंदे, पोकाॅ नवनाथ दहिफळे, पोकाॅ किशोर जाधव आणि पोकाॅ नागरे यांनी सहभाग घेतला. 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!