संगमनेर 76 लाखांचा गांजा पकडला !
दोघांना अटक ; तीन जण पसार
संगमनेर / प्रतिनिधी
ओडिशा राज्यातून पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येणाऱ्या तब्बल १५२.६१ किलो गांजावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कारवाई केली. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायखिंडी फाटा, ता. संगमनेर येथे सापळा रचून टाटा नेक्सॉन कारची तपासणी करण्यात आली. या कारवाईत ७६ लाख ३० हजार ५०० रुपये किमतीचा १५२.६१ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, कार, मोबाईल, रोख रक्कम व अन्य साहित्य असा एकूण ८८ लाख ७७ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पथक संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. टाटा नेक्सॉन कार क्रमांक एमएच-१२-यूएफ-९११३ या वाहनामध्ये अमली पदार्थ असून, सदर वाहन नाशिकहून संगमनेरच्या दिशेने येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, संगमनेर शहर पोलीस ठाणे यांना लेखी अहवालाद्वारे कळविली.

त्यानंतर संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक तसेच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, संतोष पगारे, रावसाहेब लोखंडे तसेच पोलीस अंमलदार आत्माराम पवार, विजय आगलावे, विशाल कर्पे आणि ऋतीक बेनके हे पंचांसह आवश्यक साहित्य घेऊन कारवाईसाठी पोलीस ठाण्यातून रवाना झाले.
काही वेळाने पोलिसांना माहितीतील टाटा नेक्सॉन कार क्रमांक एमएच-१२-यूएफ-९११३ येताना दिसली. पोलिसांनी सदर कार थांबवून पंचांसमक्ष तिची तपासणी केली असता त्यामध्ये अमली पदार्थ आढळून आले.
त्यानंतर कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
१) दत्तात्रय नानाभाऊ इचके (वय ३३)
२) श्रीहरी बाळू मिडगुले (वय ३५)
दोघेही रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी पंचांसमक्ष ताब्यातील आरोपी आणि कारची झडती घेतली. त्यावेळी आरोपींच्या ताब्यातून ७६ लाख ३० हजार ५०० रुपये किमतीचा १५२.६१ किलो गांजा जप्त करण्यात आला.
याशिवाय पोलिसांनी पुढील मुद्देमाल ताब्यात घेतला :
– १५२.६१ किलो गांजा — किंमत ७६,३०,५०० रुपये
– रिकाम्या प्लॅस्टिक पिशव्या
– खाकी रंगाचे रिकामे पुडके
– दोन HSRP क्रमांक प्लेट
– टाटा नेक्सॉन कार क्रमांक एमएच-१२-यूएफ-९११३ — किंमत १२ लाख रुपये
– दोन मोबाईल — किंमत ३२,००० रुपये
– रोख रक्कम — १७,९७० रुपये
– आधार कार्ड
– एटीएम कार्ड
असा एकूण ८८ लाख ७७ हजार ४७० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ओडिशातून गांजा आणल्याची आरोपींची माहिती
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत पोलिसांनी ताब्यातील आरोपींकडे विचारपूस केली. त्यावेळी आरोपींनी हा गांजा ओडिशा राज्यातून ‘कुंफू’ नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले. संबंधित कुंफू याचे पूर्ण नाव व पत्ता आरोपींना माहित नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच हा गांजा पुढे साहेबराव उर्फ भाऊसाहेब बाबू मिडगुले, रा. कान्हूर मसाई, ता. शिरूर, जि. पुणे आणि विशाल उर्फ दादया, पूर्ण नाव व पत्ता माहित नाही, रा. पुणे यांना देण्यात येणार असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.
या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ८२१/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम मधील कलम ८ (क), २० (ब), ii (क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
या कारवाईत संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक; पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव; पोलीस अंमलदार विजय पवार, रिचर्ड गायकवाड, विकास साळवे, राहुल डोके, भीमराज खर्से, भगवान थोरात, सुनील मालणकर, महादेव भांड, तसेच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, सहायक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, संतोष पगारे, रावसाहेब लोखंडे, पोलीस अंमलदार आत्माराम पवार, विजय आगलावे, विशाल कर्पे आणि ऋतीक बेनके सहभागी होते.

