संगमनेरात जमिनीच्या वादातून आत्महत्या ; दोघांविरुद्ध गुन्हा
संगमनेर प्रतिनिधी –
कोल्हेवाडी रोड येथील चार गुंठे जमिनीच्या ताब्यावरून सुरू असलेल्या वादातून मानसिक त्रासाला कंटाळून रामअवतार गुप्ता यांनी आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निंबाळे शिवारात घडली. या प्रकरणी अविनाश रामअवतार गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किसन सखाराम काळे आणि बाळू ऊर्फ रविंद्र किसन काळे, दोघे रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर, यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अविनाश रामअवतार गुप्ता, वय २३ वर्षे, व्यवसाय बेकरी, रा. विजयनगर, कुरण रोड, संगमनेर, यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत संपूर्ण घटनाक्रम नमूद केला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, सुमारे दोन वर्षांपूर्वी रामअवतार गुप्ता यांनी किसन सखाराम काळे आणि बाळू ऊर्फ रविंद्र किसन काळे यांच्याकडून कोल्हेवाडी रोड येथील त्यांच्या जमिनीपैकी चार गुंठे जमीन २५ लाख रुपयांना खरेदीखत करून खरेदी केली होती.
त्यानंतर रामअवतार गुप्ता यांनी खरेदी केलेली ही जमीन परवेज अन्वर खान आणि मोहम्मदुज्जमील मोहम्मद सलीम मोमीन यांना इस्माईल शेख बॅटरी वाला संगमनेर यांच्या मध्यस्थीने २४ लाख रुपयांना विकली. या व्यवहारात परवेज अन्वर खान यांनी इस्माईल शेख यांच्या समक्ष ६ लाख ५० हजार रुपये दिले असून, उर्वरित पैसे जमिनीचा ताबा दिल्यानंतर देण्याचे ठरले होते.
जमीन मुस्लिमांना विकल्याचा आरोप करून शिवीगाळ
फिर्यादीने म्हटले आहे की, त्यानंतर रामअवतार गुप्ता हे किसन सखाराम काळे आणि बाळू ऊर्फ रविंद्र किसन काळे यांना जमिनीचा ताबा देण्याबाबत वारंवार सांगत होते. मात्र, दोघांनी रामअवतार गुप्ता यांना “तुम्ही मुस्लिम लोकांना ही जमीन का विकली”, असे म्हणत शिवीगाळ केली.

त्यानंतर परवेज अन्वर खान आणि मोहम्मदुज्जमील मोहम्मद सलीम मोमीन यांनी इस्माईल शेख बॅटरीवाला यांच्या मध्यस्थीने पुन्हा ती जमीन घेण्याबाबत व्यवहार केला. मात्र, हा व्यवहार पूर्ण झाला नाही.
या संपूर्ण व्यवहारामुळे रामअवतार गुप्ता यांना मोठा मानसिक त्रास झाला. किसन सखाराम काळे आणि बाळू ऊर्फ रविंद्र किसन काळे यांनी रामअवतार गुप्ता यांच्याकडे जमिनीच्या ताब्याबाबत विचारणा केली मात्र ताबा मिळाला नाही. त्यामुळे वाद झाले.
या वादामुळे रामअवतार गुप्ता यांना मोठा मानसिक त्रास झाला. तसेच, त्यांनी संबंधित व्यक्तींना जमिनीला भिंतीचे कंपाउंड करून देण्यास सांगितले होते.
५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रामअवतार गुप्ता हे घरातून दुकानावर जात असल्याचे सांगून निघून गेले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या मोबाईलवर एक व्हिडिओ पाठविला. त्या व्हिडिओमध्ये किसन सखाराम काळे आणि बाळू ऊर्फ रविंद्र किसन काळे हे कोल्हेवाडी रोड येथील चार गुंठे जमिनीचा ताबा देत नसल्याने आपण त्रस्त झाले असून आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते.

यानंतर ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास, रामअवतार गुप्ता हे निंबाळे शिवारातील नदीकाठी असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात किसन सखाराम काळे आणि बाळू ऊर्फ रविंद्र किसन काळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
