आश्वी येथील घरफोडीचा गुन्हा उघड ; चार आरोपी ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; तीन आरोपी फरार
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
आश्वी परिसरातील घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरण्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, अन्य तीन आरोपी फरार आहेत.
पानोडी (ता. संगमनेर) येथील नवनाथ कारभारी पाबळ (वय ५०) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करताना सायरब जैनु काळे याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती समोर आली. तो साथीदारांसह श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे शोधमोहीम राबवली.

या कारवाईत सायरब जैनु काळे (रा. बिलोनी, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), कलर सुरेश काळे (वय २२), सोन्या सुरेश काळे (वय २०) आणि संदिप सुरेश काळे (वय २१, तिघेही रा. लगडवाडी, कोळगाव, ता. श्रीगोंदा) या चौघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरफोडीत अमरेश निजाम काळे, बाबू टबुक्या चव्हाण आणि घाऱ्या टबुक्या चव्हाण यांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून, हे तिघे फरार आहेत.
ताब्यातील आरोपींना पुढील तपासासाठी आश्वी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आश्वी पोलीस करीत आहेत.
