वाळू तस्करांवर घारगाव पोलिसांची कारवाई
संगमनेर प्रतिनिधी –
घारगाव पोलिसांनी बेकायदेशीररित्या गौण खनिज (वाळू) वाहतूक करणाऱ्या एका टिप्परवर कारवाई करून वाहनासह वाळू जप्त केली. ही कारवाई २९ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास अकलापूर शिवारात करण्यात आली.
घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पथक रात्री गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अकलापूर शेळकेवाडी शिवारात एक विना नंबरचा अशोक लेलँड कंपनीचा टिप्पर चोरीच्या पद्धतीने वाळू वाहतूक करीत आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी अकलापूर शिवारातील मुळा नदीजवळ पेट्रोलिंग सुरू केले. त्यावेळी पोलिसांना अशोक लेलँड कंपनीचा विना नंबरचा टिप्पर आढळून आला. पोलिसांनी टिप्परची पाहणी केली असता त्यामध्ये गौण खनिज (वाळू) आढळून आली.

पोलिसांनी चालकाकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी टिप्पर चालकाकडे त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव १) दादाभाऊ नामदेव मधे (रा. शेळकेवाडी, अकलापूर, ता. संगमनेर असे सांगितले. त्याच्यासोबत गाडीमध्ये असलेल्या व्यक्तीने आपले नाव २) संदीप विलास मधे, रा. शेळकेवाडी, अकलापूर, ता. संगमनेर) असे सांगितले.
पोलिसांनी टिप्परच्या मालकाबाबत विचारणा केली असता चालकाने सदर वाहन संदीप महादू नंदकर, रा. शेळकेवाडी, अकलापूर, ता. संगमनेर यांचे असल्याचे सांगितले. तसेच सदर वाहन मुळा नदीपात्रातून वाळू भरून आणल्याचे त्याने सांगितले. टिप्परमध्ये अंदाजे ०२ ब्रास वाळू असून तिची किंमत प्रति १० हजार रुपये ब्रासप्रमाणे २० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अशा प्रकारे पोलिसांनी २० हजार रुपयांची वाळू आणि अंदाजे १० लाख रुपये किमतीचा टिप्पर, असा एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बेकायदेशीररित्या गौण खनिज (वाळू) चोरी करून त्याची वाहतूक करत असताना मिळून आल्याने टिप्पर चालक दादाभाऊ नामदेव मधे, त्याच्यासोबत असलेला संदीप विलास मधे आणि वाहनमालक संदीप महादू नंदकर, सर्व रा. शेळकेवाडी, अकलापूर, ता. संगमनेर, यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३९२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
