संगमनेरमध्ये गांधी जयंती उत्साहात
गांधी वेशभूषेतील १५७ विद्यार्थी, कस्तुरबा वेशभूषेतील १०० विद्यार्थिनींची प्रभात फेरी
संगमनेर (प्रतिनिधी) —
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळीच्या वतीने संगमनेर येथे प्रभात फेरी व गांधी भजनांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गांधी वेशभूषेतील १५७ विद्यार्थी आणि कस्तुरबा वेशभूषेतील १०० विद्यार्थिनींच्या सहभागामुळे शहराचे लक्ष वेधले गेले.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयापासून प्रभात फेरीला सुरुवात झाली. नाशिक-पुणे रस्त्यावरून बसस्थानकापर्यंत काढण्यात आलेल्या या फेरीत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ व ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत गांधी भजने सादर केली.

बसस्थानकावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात बोलताना डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, सत्य, अहिंसा, नैतिकता आणि निर्भयतेच्या विचारांतून महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यात समाजातील सर्व घटकांना एकत्र आणले. गांधीजींच्या विचारांमुळे जगामध्ये भारताची वेगळी ओळख निर्माण झाली असून, शांतता व मानवतेसाठी गांधी विचार आजही आवश्यक आहेत.
यावेळी तुषार भोसले यांनी गांधीजींची रांगोळी, सुगंध जाधव यांनी चित्र, तर ओंकार मोरे व कृष्णा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसमोर गांधीजींची मूर्ती साकारली. प्रा. विनोद राऊत, अविनाश कदम, गणेश गोरडे, मंगेश बिडवे व सौरभ रणधीर यांनी ‘रघुपती राघव राजाराम’, ‘वैष्णव जन तो’, ‘साबरमती के संत’ यांसह विविध भजने सादर केली.
कार्यक्रमास डॉ. नामदेव गुंजाळ, प्रा. बाबा खरात, प्रा. प्रकाश पारखे, डॉ. बाळासाहेब वाघ, एस. एम. खेमनर, ॲड. मधुकर गुंजाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. प्रकाश पारखे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर आभार डॉ. नामदेव गुंजाळ यांनी मानले.
