गणेश विसर्जनासाठी एकविराच्या ४५० युवक – युवतींची सेवा
पर्यावरणपूरक विसर्जनासह निर्माल्य संकलन ; प्रवरा नदीकाठी सुरक्षिततेची व्यवस्था
संगमनेर प्रतिनिधी :
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये गणेश विसर्जन शांततापूर्ण व पर्यावरणपूरक वातावरणात पार पडले. डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या ४५० युवक-युवतींनी विविध विसर्जनस्थळी नागरिकांना मदत केली. निर्माल्य संकलन व परिसर स्वच्छतेचाही उपक्रम राबविण्यात आला.
एकविरा फाउंडेशन आणि संगमनेर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गंगामाई घाट, म्हाळुंगी नदीकाठासह विविध ठिकाणी स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. नागरिकांना सुरक्षित विसर्जनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रवरा नदीकाठी खोल पाणी असल्याने सुरक्षारक्षक, पोहणारे युवक आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली होती. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने कन्व्हेयरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी विसर्जनात सहभाग घेतला.
बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘यंदा पावसाचे संकट असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची बचत महत्त्वाची असून सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना मदत करावी. महाराष्ट्रात चांगला पाऊस पडून शेतकरी आनंदी होऊ दे,’’ अशी प्रार्थना त्यांनी केली.
आमदार सत्यजित तांबे यांनी एकविराच्या स्वयंसेवकांकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवेचे कौतुक केले. थोरात कारखान्याने यांत्रिकीकरणाची मदत करून दुर्घटना टाळण्यासाठी योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, ‘‘एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरणासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. गेल्या सात वर्षांपासून गणेश विसर्जनावेळी नागरिकांना सेवा दिली जात आहे.’’
दरम्यान, जाणता राजा मैदानावर कृत्रिम तलावाचीही व्यवस्था करण्यात आली होती. अनेक नागरिकांनी येथे गणेशमूर्तींचे विसर्जन केले. निर्माल्य संकलनातून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
