“हात धुवा” दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

जागतिक हात धुवा दिनानिमित्त १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने नागरिकांमध्ये वैयक्तिक स्वच्छता, हात धुण्याचे महत्त्व आणि आरोग्यदायी सवयींबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना हात धुण्याची योग्य पद्धत, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि स्वच्छतेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून घेणे, ग्रामस्तरावर जनजागृती करणे, समुदाय बैठका आयोजित करणे आणि शाळांमधून जनजागृती रॅली काढणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमांचे नियोजन गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी आपापल्या स्तरावर करावे. राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा सचित्र अहवाल १९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या संबंधित कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हात धुण्याची सवय अंगीकारल्याने स्वच्छता राखण्यास आणि संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्ह्यात व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!