‘कोहा’ ग्रंथालय व्यवस्थापन प्रणालीने रयतच्या सर्व ग्रंथालयांना मिळणार डिजिटल जोडणी
ग्रंथालय सेवांची गुणवत्ता वाढणार ; विद्यार्थी, शिक्षक व संशोधकांना होणार अधिक प्रभावी सेवा : प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे
सातारा | प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालयांतील ग्रंथालयांचे संगणकीकरण, आधुनिकीकरण आणि एकात्मिक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘कोहा’ ग्रंथालय व्यवस्थापन प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार असून, या माध्यमातून संस्थेतील सर्व ग्रंथालये एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडली जाणार आहेत. त्यामुळे ग्रंथालय सेवांची गुणवत्ता वाढून विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांना अधिक प्रभावी, पारदर्शक व जलद सेवा उपलब्ध होईल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव तथा सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.
रयत शिक्षण संस्था, सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोहा : ग्रंथालय व्यवस्थापन प्रणाली’ या विषयावरील अध्यापक विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे ऑडिट विभागाचे सहसचिव तथा छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, कार्यक्रमाध्यक्ष तथा कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. ए. सी. अत्तार, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर संजय क्षीरसागर तसेच संस्थेतील विविध महाविद्यालयांचे ग्रंथपाल उपस्थित होते.
प्रशिक्षण कार्यक्रमात एम.ए.पी. (MAP) सिस्टिम्सचे झोनल मॅनेजर सोमशेखर थळंगे आणि डॉ. त्रिवेणी चंद्रिकी यांनी ‘कोहा’ ग्रंथालय व्यवस्थापन प्रणालीची वैशिष्ट्ये, ग्रंथालय ऑटोमेशन, डिजिटल रिपॉझिटरी, डेटा व्यवस्थापन आणि आधुनिक ग्रंथालय सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सहभागी ग्रंथपालांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रणालीची माहिती आत्मसात करत विविध शंकांचे निरसन करून घेतले.

रयत शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालयांतील ग्रंथालये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सक्षम, पारदर्शक आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने हा अध्यापक विकास कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक छत्रपती शिवाजी कॉलेजचे ग्रंथपाल एकनाथ झावरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या ग्रंथपाल मानसी रसाळ यांनी करून दिला. आभार प्रदर्शन इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या ग्रंथपाल मनीषा उमाप यांनी केले, तर सूत्रसंचालन योगिता बाबर यांनी केले.
