ढिम्म महसूल विभागाला ग्रामपंचायतीनेही केली विनंती ; वाळू चोरी थांबवा !

राजापूरच्या खतोडे मळा–आढळा नदी परिसरात बेकायदा वाळू उपशाचा आरोप ; पंचनामा केला, मात्र कारवाई अद्याप प्रतीक्षेत

संगमनेर प्रतिनिधी –

राजापूर येथील खतोडे मळा परिसरातील आढळा नदीपात्रात परवानगी नसताना वाळू उपसा करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नव्यानेच राजकीय क्षेत्रात उदयास आलेल्या एका नेत्याच्या पुढाकाराने महसूल प्रशासनाची दिशाभूल करून वाळू उपसा करण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकाराची दखल घेत राजापूर ग्रामपंचायतीने ठराव करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महसूल प्रशासनाकडे केली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आढळा नदी परिसरातून वाळू उपसा केल्यानंतर संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करण्यात आला. वाळू उपसा करणाऱ्यांनी रस्त्यावरही वाळू टाकल्याचे निदर्शनास आले असून, हीच वाळू पुढे विक्री करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच काही व्यक्तींच्या घरांच्या परिसरात वाळूचे डेपो असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत.

या प्रकाराबाबत राजापूर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. बेकायदा वाळू उपशाविरोधात ग्रामसभेत ठराव करण्यात येऊन महसूल प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पंचनामा झाला ; कारवाई कधी ?

ग्रामपंचायतीचा ठराव, ग्रामस्थांच्या तक्रारी आणि त्यानंतर महसूल विभागाकडून पंचनामा होऊनही संबंधितांवर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “ठराव झाला, ग्रामस्थांनी तक्रारी केल्या, महसूल विभागाने पंचनामा केला; मग कारवाई कधी ?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

वाळूचा साठा, वाहतूक आणि विक्रीची चौकशीची मागणी

परवानगीशिवाय नदीपात्रातून वाळू उपसा झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधितांकडून दंड वसूल करण्यासह नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच नदीपात्रातून उपसा करण्यात आलेल्या वाळूचा साठा, तिची वाहतूक आणि कथित विक्री याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात कोणाला राजकीय पाठबळ आहे का, महसूल प्रशासनाची दिशाभूल करून वाळू उपशाला परवानगी मिळविण्याचा प्रयत्न झाला का आणि वाळू विक्रीतून आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

पंचनामा झाल्यानंतर आता महसूल प्रशासन पुढील कोणती कारवाई करते, याकडे खतोडे मळा परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!