अवैध दारू विक्री ; आस्थापना कायमस्वरूपी सील करा – दारूबंदी कृती समितीची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

बनावट दारूवर संगमनेर उत्पादन शुल्काची धडक कारवाई – दोघांना अटक

संगमनेर प्रतिनिधी –

गोवा बनावटीची आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली बनावट दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर पथकाने ६ ऑगस्ट रोजी मोठी कारवाई केली. या धाडीत एकूण ४ लाख ९९ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, केवळ किरकोळ कारवाया न करता अवैध दारू विक्री करणाऱ्या आस्थापना कायमस्वरूपी सील करा, अशी आक्रमक मागणी दारूबंदी कृती समितीने केली आहे.

उत्पादन शुल्क विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संगमनेर येथील शिवाजी नगर (वडगे मळा, जनता राजा मैदानाजवळ, घर क्र. ८०४/२) येथे छापा टाकला. या ठिकाणी ‘ROYAL IMPACT’ व्हिस्कीचे ३४ बॉक्स, विविध नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट दारूचे साहित्य व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा ४ लाख ३८ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी शिवकुमार मनोजकुमार कालडा व सौरभ अरविंद पापडेजा या दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या गुन्ह्याचा दुवा नेहरू चौकातील ‘हॉटेल सुरभी’ (FL-3 लायसन्स क्र. १९३) या ठिकाणाशी जोडलेला असल्याचे तपासात समोर आले. तेथून नामांकित ब्रँडच्या बनावट दारूच्या बाटल्या व इतर साहित्य मिळून आणखी ६१ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत विभागीय गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या कारवाईचे स्वागत करतानाच दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अमर कतारी यांनी अवैध दारूविक्रीविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. आखाड महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात विशेष धडक मोहीम राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

ज्या बार, हॉटेल किंवा दुकानात बनावट दारू आढळेल, त्यांचे परवाने रद्द करून ती आस्थापना कायमस्वरूपी सील करण्यात यावी. बनावट दारू मानवी आरोग्यास घातक असल्याने जप्त दारूचे अन्न व औषध प्रशासन/प्रयोगशाळेकडून परीक्षण करून दोषींवर कठोर गुन्हे नोंदवावेत. एकाच ठिकाणी वारंवार होणाऱ्या अवैध विक्रीवर अधिकाऱ्यांनी कडक नजर ठेवावी आणि निष्पक्ष कारवाई करावी.

“प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलून अवैध दारूविक्रीला आळा घातला नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा अमर कतारी (जिल्हाध्यक्ष, दारूबंदी कृती समिती तथा शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख), तालुकाध्यक्ष रंगनाथ फटांगरे, शहराध्यक्ष संभव लोढा आणि जिल्हा सरचिटणीस सचिन साळवे यांनी दिला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!