नाशिक – पुणे रेल्वेचे काम जेथे थांबले तेथून सुरू करा — माजी मंत्री बाळासाहेब थोरात
साईबाबांचा चांगल्या कामाला आशीर्वाद असतो ; काही मंडळी नेहरू गार्डनच्या रेल्वे पलीकडे जात नाही…
संगमनेर प्रतिनिधी —
नाशिक-पुणे हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा यासाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिकांनी एकत्र येत तीन तास ठिय्या आंदोलन केले. नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे घोषणांच्या निनादात तीन तास चक्काजाम आंदोलन झाले. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध मंजुऱ्या मिळालेल्या असताना हे चांगले काम थांबले कसे, असा सवाल करत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी “जेथे रेल्वेचे काम थांबले, तेथूनच काम सुरू करा,” असे आवाहन केले. नाशिक-पुणे रेल्वे सरळ मार्गानेच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

दरम्यान, थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता, “साईबाबांचा चांगल्या कामाला आशीर्वाद असतो. चांगल्या कामात कुणी राजकारण करू नये,” अशी टीका केली. तसेच “काही मंडळी नेहरू गार्डनच्या रेल्वे पलीकडे जात नाहीत,” असे म्हणत आमदार अमोल खताळ यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे सर्वपक्षीय नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संगमनेर तसेच अकोला तालुक्यातूनही अनेक नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. “रेल्वे आमच्या हक्काची”, “नाशिक-पुणे सरळ रेल्वे झालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रिमझिम पावसातही हजारो नागरिक तीन तास रस्त्यावर ठिय्या देऊन बसले होते.
माजी मंत्री थोरात म्हणाले की, नाशिक-पुणे सरळ रेल्वेसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. २०१९ मध्ये सरकार सत्तेवर आल्यानंतर अधिक पाठपुरावा करण्यात आला. स्वर्गीय अजितदादा पवार यांनीही या कामासाठी मदत केली. केंद्र सरकार, नीती आयोग, राज्य सरकार आणि रेल्वे विभागाच्या सरळ मार्गासाठी आवश्यक मंजुऱ्या मिळाल्या आहेत. राज्य सरकारने रेल्वेला एक हजार कोटी रुपये दिल्यानंतर भूसंपादन सुरू झाले. गोल्डन ट्रँगलसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सरळ रेल्वे मार्गाचे काम थांबण्याचे कारण काय, हे कळत नाही.

या चांगल्या कामात कुणी खोडा घातला, असा सवाल करताना सर्व मंजुऱ्या मिळत असताना जीएमआरडीची कोणतीही अडचण आली नव्हती, मग आताच अडचण कशी निर्माण झाली, असा प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केला.
शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र समिती नेमून पुन्हा शून्यापासून काम सुरू होणार असेल तर आतापर्यंत झालेले काम वाया जाण्याची शक्यता आहे. समिती आली म्हणजे धोका आहे. हा खेळ जनतेच्या भावना आणि विकासाशी संबंधित आहे, असे थोरात म्हणाले.
सरळ रेल्वे मार्गामुळे देशाशी कनेक्टिव्हिटी वाढणार असून शेतकरी, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी आणि तरुणांना मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. भविष्यातील पिढ्यांच्या विकासासाठी होणाऱ्या या रेल्वेमध्ये कोणीही राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. ही रेल्वे सरळ मार्गानेच झाली पाहिजे आणि जेथे रेल्वेचे काम थांबले आहे, तेथूनच ते पुन्हा सुरू करावे, अशी आग्रही मागणी थोरात यांनी केली.

पद्मश्री रघुवीर खेडकर म्हणाले की, कलावंत म्हणून नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग झाला पाहिजे, अशी माझी आग्रही मागणी आहे. “हे संगमनेरच्या प्रवरेचे पाणी आहे. संगमनेरचे रक्त आहे. ते थांबत नाही. आमची प्रगती कोणी थांबवू शकत नाही,” असे ते म्हणाले.
सरळ रेल्वे मार्गासाठी सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आले आहेत. साईबाबा आमच्या हृदयात आहेत. भावनिक शब्द वापरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. विकासाला कोणी आडवा येत असेल तर त्याला आडवा करा, असे आवाहनही खेडकर यांनी केले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग हा नैसर्गिक मार्ग आहे. मात्र संगमनेर तालुक्याचा विकास थांबवण्यासाठी काही मंडळींनी जाणीवपूर्वक या मार्गामध्ये बदल केला आहे. संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी संगमनेरच्या बाजूने कधी बोलत नाहीत. हा लढा भविष्यातील पिढ्यांसाठी आहे. सर्वांनी एकत्र आले पाहिजे. केंद्र सरकारने जनतेचा आवाज ऐकून तातडीने सरळ मार्गाने रेल्वे करावी, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, नाशिक-पुणे सरळ रेल्वे हे स्वर्गीय अजितदादांचे स्वप्न होते. राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनीही या कामासाठी अधिक लक्ष दिले पाहिजे. चांगल्या कामांमध्ये राजकारण नको. जनतेच्या हिताचे राजकारण करा, मतांचे नको, असे सांगताना काही मंडळी केवळ पोस्टरबाजी करत असल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली.
या रेल्वेमुळे शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि युवकांना भविष्यात मोठ्या संधी मिळणार आहेत. हा लढा साईबाबांच्या श्रद्धा आणि समोरच्या मार्गाने आहे. साईबाबा नेहमी सत्याच्या पाठीमागे असतात. मात्र काही लोकांना संगमनेरची प्रगती पहावत नसल्याने ते अडचणी निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी हिरालाल पगडाल, रामहरी कातोरे, छात्र भारतीचे अनिकेत घुले, डॉ. कोल्हे, अमर कतारी, विश्वास मुर्तडक, सिताराम राऊत, उत्कर्षा रूपवते, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका केली.
