प्रांताधिकाऱ्यांच्या गैरहजेरीविरोधात संतप्त शेतकऱ्यांचा पायऱ्यांवर ठिय्या !
आंदोलनकर्ते प्रांत कार्यालयात घुसले ; अखेर प्रांताधिकाऱ्यांना मोर्चास्थळी येऊन स्वीकारावे लागले निवेदन
संगमनेर विशेष प्रतिनिधी :
तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, विजेचा खेळखंडोबा आणि हक्काचे पाणी इतरत्र वळविल्याच्या प्रश्नांवरून संगमनेर तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. या प्रश्नांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हजारो शेतकरी, नागरिक आणि महिलांनी मंगळवारी ‘जन आक्रोश मोर्चा’ काढला. मात्र, मोर्चाची पूर्वकल्पना देऊनही प्रांताधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नसल्याने वातावरण चांगलेच तापले. संतप्त आंदोलकांनी प्रांत कार्यालयात प्रवेश करत थेट प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले.
मोर्चाची माहिती चार दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. असे असतानाही प्रांताधिकारी अरुण उंडे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. भर उन्हात शेतकरी आणि महिला ताटकळत राहिल्याने त्यांचा संताप अनावर झाला. प्रशासनाच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी प्रांत कार्यालयाच्या मुख्य गेटमधून आत प्रवेश केला.

परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक आंदोलकांना शांत केले. त्यानंतर थोरात यांच्यासह डॉ. जयश्री थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे तसेच विविध शिखर संस्थांचे पदाधिकारी यांनी प्रांत कार्यालयाच्या पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन सुरू केले.
नेत्यांसह शेतकऱ्यांचा ठिय्या ; प्रशासनाची धावपळ
शेतकऱ्यांचा वाढता रोष आणि नेत्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे यांना यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथे मोर्चास्थळी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारावे लागले.

‘आमदाराचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का ?’
निवेदन स्वीकारताना बाळासाहेब थोरात यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “प्रांताधिकारी हा संपूर्ण तालुक्याचा प्रमुख असतो. हजारो शेतकरी आपल्या व्यथा मांडण्यासाठी रस्त्यावर उतरले असताना प्रशासन कुणाच्या तरी राजकीय दबावाखाली काम करत आहे. सध्याचे आमदार शिव्या देतात तरी तुम्ही गप्प ऐकून घेता. उलट त्यांचे फ्लेक्स लावण्याचे काम करता. हे काम प्रांताधिकाऱ्याचे नाही. तुम्ही कोणाचे गुलाम झाला आहात का?”
यावर स्पष्टीकरण देताना प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी आपला नियोजित कार्यक्रम असल्याचे सांगितले. मात्र, बाळासाहेब थोरात मोर्चामध्ये असल्याचे समजल्यानंतर आपण तातडीने मोर्चास्थळी आलो, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपस्थित शेतकरी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दुष्काळ, वीज आणि पाण्याच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
