संगमनेरात शेतकऱ्यांचा महाआक्रोश मोर्चा !
दुष्काळ जाहीर करा, हक्काचे पाणी व पूर्ण दाबाने वीज द्या ; माजी मंत्री बाळासाहेब थोरात
निष्क्रियता म्हणजे नवीन लोकप्रतिनिधी…
संगमनेर / प्रतिनिधी :
तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती, पिकांचे नुकसान, विजेचा खेळखंडोबा आणि हक्काचे पाणी मिळत नसल्याच्या मुद्द्यांवर हजारो शेतकरी, नागरिक, युवक व महिलांनी महाआक्रोश मोर्चा काढला. दुष्काळ जाहीर करून शेतकरी व शेतमजुरांना तातडीने मदत द्यावी, हक्काचे पाणी मिळावे आणि पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
यशोधन कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालय काढण्यात आलेल्या मोर्चात बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले. काही शेतकरी बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि जळालेली पिके घेऊन मोर्चात सहभागी झाले.

‘सरकार जागे झाले नाही तर जागा सोडावी लागेल’
बाळासाहेब थोरात यांनी आरोप केला की, राज्यात गंभीर दुष्काळाची परिस्थिती असून पिके जळाली आहेत आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. “पंचनामे कशाला करता ? राज्यात पाऊस नाही, सरसकट मदत करा,” अशी मागणी त्यांनी केली. यंदाची परिस्थिती १९७२ पेक्षाही वाईट असल्याचा दावा थोरात यांनी केला. “सरकार जागे झाले नाही तर शेतकरी त्यांना जागा सोडायला लावेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
हक्काच्या पाणी-वीजेचा मुद्दा
निळवंडे धरण व कालव्यांसाठी मोठा संघर्ष केल्याचा दावा करत थोरात यांनी तालुक्यातील साडेबासष्ट हजार एकर शेतीला या पाण्याचा लाभ होणार असल्याचे सांगितले. हक्काचे पाणी उचलता येत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “वीज जाते म्हणजे फक्त वीज जात नाही, पाणी पुढे जाते. पाणी पुढे गेले तर संपूर्ण जीवन आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल,” असे थोरात म्हणाले. आवर्तन काळात नदीकाठी ११ तास हक्काची वीज मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘इथे अंधार पडला त्याचे काय ?’
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी आरोप केला की, तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरू असून बाजारपेठ ओस पडत आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. “जगात प्रकाश पाडला म्हणतात, पण इथे अंधार पडला त्याचे काय ?” असा सवाल त्यांनी केंद्र व राज्य सरकारला केला.
डॉ. जयश्री थोरात यांनी दावा केला की, संघर्षातून संगमनेरला हक्काचे पाणी व वीज मिळवून देण्यात आली. निळवंडे धरण व कालव्यांचे श्रेय घेण्यावरून त्यांनी नवीन लोकप्रतिनिधींवर नाव न घेता टीका केली. “तालुका उभा कोणी केला, याचा अभ्यास करा,” असा टोला त्यांनी लगावला.
अजय फटांगरे, अमोल शेरकर, रामहरी कातोरे, किसनराव पानसरे, कोमल उगले, भाऊराव रहाणे, प्रियांका गडगे, संदीप थिटमे व कल्याणी राहणे यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका केली.

‘निष्क्रिय माणसाची जास्त चर्चा करू नका’
आमदार अमोल खताळ यांचे नाव न घेता टीका करताना बाळासाहेब थोरात यांनी आरोप केला की, त्यांचे राजकारण फ्लेक्सपुरते मर्यादित आहे. “गावोगावी दोन हजार फ्लेक्स लावले आहेत. फ्लेक्स लावून पोट भरणार नाही. हे पैसे गरिबांसाठी खर्च करा,” असे ते म्हणाले. “नागरिकांना काम पाहिजे. अशा निष्क्रिय माणसाची जास्त चर्चा करू नका,” असा टोला थोरात यांनी लगावला. त्यांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांनी घोषणाबाजी केली.
